INS Malvan warship induction Indian Navy: कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधलेली दुसरी पाणबुडीविरोधी युद्धनौका ‘मालवण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत स्वदेशी संरक्षण उत्पादनांना चालना देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे बोलले जाते. ३१ मार्च रोजी, ही युद्धनौका नौदलाच्या स्वाधीन करण्यात आली. नौदलाला अशा आठ अँटी सबमरीन युद्धनौका मिळणार आहेत. त्यातील ही दुसरी युद्धनौका आता सेवेत रुजू होत आहे.
‘मालवण’ नाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा
‘मालवण’ हे नाव महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील ऐतिहासिक शहर असलेल्या ‘मालवण’वरून घेण्यात आले आहे. हा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली सागरी वारशाशी जोडला गेलेला आहे. ही युद्धनौका पूर्वीच्या ‘आय एन एस मालवण’ या भारतीय नौदलाच्या सुरुंग शोधक जहाजाचा वारसाही पुढे चालवते. हे जुने जहाज २००३ पर्यंत सेवेत होते. अशा प्रकारे, प्रतिष्ठित युद्धनौकांची नावे जतन करण्याची नौदलाची परंपरा या जहाजाद्वारे अखंडपणे सुरू ठेवली गेली आहे.
ही युद्धनौका पाण्याखाली पाळत ठेवणे, किनारपट्टीजवळील पाण्यात पाणबुडीविरोधी युद्धमोहिमा (एएसडब्ल्यू) राबवणे, कमी तीव्रतेच्या सागरी कारवाया (लिमो) आणि सुरुंग युद्धक्षमता यांसाठी सुसज्ज आहे. सुमारे ८० मीटर लांबी आणि १,१०० टन विस्थापन क्षमता असलेल्या या युद्धनौकेवर टॉर्पेडो, बहुउद्देशीय पाणबुडीविरोधी रॉकेट्स आणि प्रगत रडार व सोनार प्रणालींसह अत्याधुनिक सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेणे आणि त्यांना निष्क्रिय करण्यात सक्षम असलेल्या ‘मालवण’मुळे आता नौदलाची ताकद आणखी वाढली आहे.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा समावेश असलेली ‘मालवण’ ही युद्धनौका स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे; तसेच ती भारत सरकारचा ‘आत्मनिर्भर भारत’ हा दृष्टिकोन पुन्हा एकदा अधोरेखित करते.
ही युद्धनौका अशी उपकरणे आणि प्रणाली अभिमानाने वाहून नेते, ज्यांची निर्मिती आणि एकत्रीकरण देशांतर्गत संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उद्योगांनी केले आहे, यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा समावेश आहे, असेही संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
