Indian Navy Somalia Pirate Rescue Operation: सोमालियाच्या किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी हायजॅक केलेल्या मासेमारी जहाजावरील २० कर्मचाऱ्यांची भारतीय नौदलाने धाडसी कारवाई करत सुखरूप सुटका केली आहे. या मोहिमेत नौदलाच्या मरीन कमांडोंनी थेट पॅराशूटच्या साहाय्याने जहाजावर उतरत समुद्री चाच्यांचा धोका मोडून काढला. भारतीय नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त समन्वयातून तब्बल ४८ तास चाललेली ही मोहीम यशस्वी झाली. विशेष म्हणजे, या संपूर्ण कारवाईत एकाही कर्मचाऱ्याला दुखापत झाली नाही किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
भारतीय नौदलाने मंगळवारी (३ नोव्हेंबर) या मोहिमेबाबत माहिती दिली. नौदलाच्या माहितीनुसार, सोमालियाच्या ईशान्य किनारपट्टीजवळ ‘अझिनी’ नावाच्या मासेमारी जहाजाचे मागील महिन्यात सशस्त्र समुद्री चाच्यांनी हायजॅक केले होते. या जहाजाचा वापर समुद्री चाचे पुढील हल्ल्यांसाठी ‘मदर शिप’ म्हणून करू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे हिंदी महासागरातील आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.
हवाई दलाच्या ‘सी-१७’ विमानातून कमांडोंची पॅराशूटद्वारे एन्ट्री
या घटनेची माहिती मिळताच भारतीय नौदलाने परिसरात तैनात असलेल्या युद्धनौकेला तातडीने कारवाईचे आदेश दिले. या मोहिमेसाठी सागरी टेहळणी विमानाचीही मदत घेण्यात आली. नौदलाच्या युद्धनौकेने आणि टेहळणी विमानाने सातत्याने निरीक्षण करून हायजॅक झालेल्या जहाजाचा माग काढला. समुद्री चाच्यांना जहाज घेऊन पळून जाण्याची संधी मिळू नये, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने हालचाली करण्यात आल्या.
यानंतर भारतीय हवाई दलाच्या ‘सी-१७’ या विमानातून मरीन कमांडोंना संबंधित परिसरात अचूक पद्धतीने पॅराशूटद्वारे उतरवण्यात आले. जहाजावर उतरल्यानंतर कमांडोंनी तातडीने जहाजाचा ताबा घेतला. समुद्री चाच्यांकडून निर्माण झालेला धोका नष्ट करत जहाजावरील २० कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली. तब्बल ४८ तास चाललेल्या या मोहिमेत नौदल आणि हवाई दलाने एकमेकांशी समन्वय साधत कारवाई पूर्ण केली.
या कारवाईमुळे भारतीय नौदलाची ताकद आणि कोणत्याही संकटात तातडीने मदत करण्याची क्षमता पुन्हा सिद्ध झाली आहे. हिंदी महासागर क्षेत्रात भारत हा प्रथम प्रतिसाद देणारा आणि विश्वासार्ह सुरक्षा भागीदार म्हणून आपली भूमिका बजावत असल्याचे नौदलाने म्हटले आहे.
यापूर्वीही नौदलाकडून समुद्री चाच्यांविरोधात कारवाई
समुद्री चाच्यांशी लढण्याची भारताची ही पहिलीच वेळ नाही. याआधी जुलै महिन्यातही, अदनच्या आखातात ‘एमव्ही गोल्डन आर्सेनल’ या जहाजावर चाच्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी जिबूतीजवळ असलेल्या भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस त्रिकंद’ या युद्धनौकेने तातडीने धाव घेऊन तो हल्ला यशस्वीपणे परतवून लावला होता. त्या जहाजावर २१ खलाशी होते.
दरम्यान, डिसेंबर २०२३ पासून २०२४ च्या सुरुवातीच्या महिन्यांपर्यंत भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन संकल्प’ अंतर्गत समुद्री चाच्यांच्या हल्ल्यांविरोधात अनेक महत्त्वपूर्ण मोहिमा राबवल्या होत्या.
