वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय नौदलाची आघाडीची युद्धनौका आणि पाकिस्तानी नौदलाच्या युद्धनौकेची मंगळवारी सायंकाळी उत्तर अरबी समुद्रात सौम्य टक्कर झाली. पाकिस्तानी नौदलाच्या नौकेचे या टकरीत मोठे नुकसान झाले असून, भारतीय नौका सुरक्षित आहे आणि पुढील मोहिमेसाठी रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पाकिस्तानी नौकेच्या समुद्रामधील अव्यावसायिक आणि असुरक्षित हालचालींचा भारताने बुधवारी तीव्र शब्दांत निषेध केला. सूत्रांनी सांगितले की, ओमानच्या आखातापासून १२० नॉटिकल मैल अंतरावर हा अपघात घडला. भारताच्या विनाशिका आणि फ्रिगिट्स उत्तर अरबी समुद्रात गेल्या काही काळापासून तैनात आहेत. पाकिस्तानी युद्धनौका ‘पीएनएस हुनैन’ या नौकेबरोबर भारताच्या युद्धनौकेची सौम्य टक्कर झाली. त्यात पाकिस्तानी नौकेचे नुकसान झाले. भारताची नौका सुरक्षित असून, टेहळणी मोहिमेवर रवाना झाली.

पाकिस्तानची ‘पीएनएस हुनैन’ ही गस्तीची नौका असून, किनारी भागात गस्त घालते. ही नौका अतिशय वेगाने भारताच्या युद्धनौकेच्या जवळ आली. असुरक्षित आणि अव्यावसायिक पद्धतीने नौकेचा समुद्रातील वावर होता.

पाकिस्तानकडून कराराचे उल्लंघन

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘ही घटना आंतरराष्ट्रीय समुद्रात घडली आणि मोठे नुकसान झाले नाही. मात्र, पाकिस्तानी नौदलाच्या नौकेची हालचाल ही दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराचे उल्लंघन आहे. लष्करी सराव, नौदलाच्या नौकांची, सैन्याच्या हालचालींची पूर्वसूचना देण्यासंबंधी एप्रिल १९९१ मध्ये झालेल्या कराराच्या दहाव्या कलमाचे पाकिस्तानने उल्लंघन केले आहे.’

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना समन्स

भारताने बुधवारी नवी दिल्लीतील पाकिस्तानचे प्रभारी यांना समन्स बजावले आणि या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. ही घटना अस्वीकारार्ह असल्याची भूमिका भारताने मांडली. परराष्ट्र मंत्रालयाने या बाबत निवेदन जारी केले. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील अधिकारी साद वाराइच यांना परराष्ट्र मंत्रालयाने समन्स बजावले. अशा घटना पुन्हा होऊ नयेत आणि दोन्ही देशांतील करारांचे पालन पाकिस्तानने योग्य रीतीने करावे, असे भारताने बजावले. तसेच, पाकिस्तानमधील भारताच्या अधिकाऱ्यांनीही पाकिस्तानमध्ये या घटनेचा तीव्र निषेध नोंदवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.