Indian oil tanker attack and firing by Iranian IRGC in Strait of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ दोन भारतीय जहाजांवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. ‘एनबीसी न्यूज’ने (NBC News) दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेत कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झालेली नाही. मात्र, जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गावरील वाढता धोका या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाला आहे.
घाबरलेल्या कर्मचाऱ्यांचा मदतीसाठी टाहो
या घटनेदरम्यान जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा गोंधळ झाला. एका जहाजावरून पाठवण्यात आलेल्या संदेशात एक कर्मचारी म्हणतोय, “तुम्हीच आम्हाला पुढे जाण्याची परवानगी दिलीत… आणि आता तुम्हीच गोळीबार करत आहात… आम्हाला मागे फिरू द्या.” एनबीसी न्यूजने मिळवलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये ‘सन्मार हेराल्ड’ (Sanmar Herald) हे जहाज या खाडीतील ‘ग्रीन एरिया’मध्ये प्रवास करताना दिसते. एका टप्प्यावर या जहाजाची ‘ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम’ (AIS) बंद करण्यात आली होती, पण नंतर पुन्हा सुरू करून जहाजाने आपला मार्ग बदलला.
गोळीबार नक्की कोणी केला?
हा गोळीबार नेमका कोणी केला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ज्या भागात नौदलाच्या हालचाली वाढल्या आहेत, तिथेच ही घटना घडली असल्याचं अहवालातून समोर येतंय. एका टँकरच्या कॅप्टनने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’शी संबंधित असलेल्या दोन युद्धनौकांनी जहाजांच्या जवळ येऊन गोळीबार केला. दुसरीकडे, इराणच्या माध्यमांनी असा दावा केला आहे की, जहाजांना आपला मार्ग बदलण्यास भाग पाडण्यासाठी हे ‘वॉर्निंग शॉट्स’ (इशारा देण्यासाठी केलेले गोळीबार) होते.
भारतीय अधिकाऱ्यांच्या मते, ही जहाजे कदाचित सामान्य गोळीबाराच्या कचाट्यात सापडली असावीत. “त्यांना विशेष लक्ष्य करण्यात आले नव्हते आणि सुदैवाने कोणतीही इजा झालेली नाही,” असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण
इराण या जलमार्गावर आपले नियंत्रण अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करत असतानाच अमेरिकन नौदलही या भागात सक्रिय आहे, ज्यामुळे व्यापारी जहाजांसाठी धोका वाढला आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्याचा मोठा हिस्सा या खाडीतून जातो, त्यामुळे इथे होणारी कोणतीही हालचाल आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय ठरते.
भारताने इराणकडे मांडली भूमिका
भारताने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तेहरानकडे (इराण) हा विषय मांडला आहे. भारतीय जहाजांच्या सुरक्षेबाबत भारताने आश्वासन मागितले असून, या संपूर्ण परिस्थितीवर भारत सरकार बारीक लक्ष ठेवून आहे.
