पाचपैकी पाच प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन भारतीय वंशाचा १२ वर्षीय अमेरिकन सात्विक कर्णीक प्रतिष्ठेच्या ‘नॅशनल जिओग्राफिक बी’ स्पर्धेत अव्वल ठरला. सात्विकच्या रूपाने याही वर्षी या स्पर्धेवर भातीय वंशाच्या मुलांनी आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले.
इक्वॅडोरमधील ‘चिंबोराझो’ हा पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून सर्वात लांब असलेला पर्वत आहे, असे त्याला विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत सात्विकने ही स्पर्धा जिंकली. सात्विकचे पालक मूळचे कर्नाटकमधील असून, अमेरिकेत माहिती तंत्रज्ञानाच्या कामानिमित्त स्थलांतरित झाले आहेत. एका मागून एक विचारलेल्या पाचही प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन सात्विकने त्याचा स्पर्धक १३ वर्षीय कोनरॅड ओबेरहाऊजला मागे टाकले.
भारतीय वंशाच्या मुलांचा स्पर्धेवर यावर्षीही वरचष्मा राहिला. या स्पर्धेमध्ये एकूण ४० लाख मुलांनी सहभाग घेतला. अंतिम फे-यांसाठी दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. त्या दहा पैकी आठ मुले भारतीय वंशाची होती.
दक्षिण बॉस्टनमधील नॉरफोल्क येथे राहणारा सात्विक, किंग फिलीप विभागीय माध्यमिक शाळेचा विद्यार्थी आहे. या स्पर्धेचे बक्षीस म्हणून सात्विकला त्याच्या पुढील शिक्षणासाठी २५ हजार अमेरिकन डॉलरची शिष्यवृत्ती मिळाली. दरवर्षी आयोजित केली जाणारी ‘नॅशनल जिओग्राफिक बी’ स्पर्धा भूगोलावर आधारित असते. या स्पर्धेच आयोजन १९८९ पासून नॅशनल जिओग्रापिक सोसायटी करते.