जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील ज्येष्ठ राजकीय नेते, माजी अर्थमंत्री आणि वर्णभेद विरोधी कार्यकर्ते प्रवीण गोर्धन (वय ७५) यांचे कर्करोगाने शुक्रवारी जोहान्सबर्ग येथील रुग्णालयात निधन झाले. १९४९ मध्ये डरबन येथे जन्मलेल्या गोर्धन गेल्या तीन दशकांपासून दक्षिण आफ्रिकेच्या सक्रिय राजकारणात आहेत. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या सरकारमध्ये विविध पदे भूषविली.

हेही वाचा >>> ‘अदानीं’शी संलग्न स्विस खाती गोठवली; ‘हिंडेनबर्ग’चा नवा दावा; समूहाचा इन्कार

२००९ ते २०१४ आणि २०१५ ते २०१७ अशा दोन वेळा त्यांनी देशाच्या अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. दक्षिण आफ्रिकेत आर्थिक अस्थैर्याचे संकेत मिळत असताना अर्थव्यवस्थेची गाडी रुळांवर आणण्यासाठी गोर्धन यांनी प्रयत्न केले. अवघ्या चार महिन्यांपूर्वी कुटुंबाबरोबर अधिक वेळ व्यतीत करण्यासाठी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. गोर्धन यांच्या जागी झुमा यांनी निष्ठावंतांची नियुक्ती केली. २००० ते २००६ या काळात गोर्धन जागतिक सीमाशुल्क संघटनेचे अध्यक्षही होते. २०१० मध्ये गोर्धन यांना भारत सरकारकडून प्रवासी भारतीय सन्मान, तर २०१९ मध्ये पद्माभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.