Dilraj Singh Gill Murder : कॅनडामध्ये गँगवॉर सुरु आहे. या ठिकाणी भारतीय वंशाच्या लोकांवर हल्ले सुरु आहेत. दरम्यान एका तरुणावर हल्ला करुन त्याची हत्या करण्यात आली आहे. दिलराज सिंग गिल असं या भारतीय वंशाच्या तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर बर्नाबी मध्ये गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. कॅनडातील गँगवॉर आणि या घटनेचा परस्पर संबंध आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे. कारण दिलराज सिंहवर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आणि एक जळती कार पोलिसांना सापडली आहे.
पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आहे?
पोलिसांनी सुरुवातीला जी चौकशी केली त्यानंतर सांगितलं की हा कुठलाही रँडम क्राइम नाही. एक टार्गेट किलिंग आहे. दिलराज सिंग गिल वॅनक्यूआरमध्ये राहात होता. कॅनडा पोलिसांच्या रडारवर हा माणूस होता. तपास यंत्रणांनी म्हटलं आहे की याची जी हत्या करण्यात आली त्याचं थेट कनेक्शन ब्रिटिश कोलंबियामध्ये सक्रिय असलेल्या गँगवॉरशी आहे. तिथे दोन गँग्जमध्ये शत्रुत्व आहे ज्यानंतर हे गँगवॉर सुरु झालं आहे. काही दिवसांपूर्वी नवप्रीत धालीवाल नावाच्या एका युवकाची हत्या झाली होती. त्यानंतर आता दिलराज नावाच्या या तरुणाची हत्या झाली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांना घटनास्थळी सापडली जळती कार
२२ जानेवारीला बर्नाबी या ठिकाणी दिलराज सिंगवर गोळ्या झाडण्यात आल्या. पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांना दिलराज सिंग हा त्या ठिकाणी पोलिसांना गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्याला तातडीने उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. दिलराज सिंह गिल अशी त्याची ओळख पटली आणि त्याचा जीव वाचला नाही. हत्येच्या ठिकाणापासून पोलिसांना एक जळती कार मिळाली. तपास यंत्रणांचं हे म्हणणं आहे की त्यांना हत्या झाली त्या ठिकाणापासून काही अंतरावर जळती कार मिळाली. या कारचा उपयोग हत्याकांडात झाला असणार असाही संशय पोलिसांना आहे. बर्नाबीमध्ये हत्या झाल्यानंतर कार जाळणं हा एक प्रकारचा पॅटर्न आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे. या हत्येच्या मागे कुठली गँग आहे? ते अद्याप समजू शकलेलं नाही असंही पोलिसांनी सांगितलं आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तपास सुरु आहे ज्यावरुन लवकरच हल्लेखोरांची ओळख पटवली जाईल असंही पोलिसांनी म्हटलंं आहे.
