Sheetal Vrazien Google executive murdered by husband: अमेरिकेतील जॉर्जियामध्ये घरगुती वादातून भारतीय वंशाच्या तंत्रज्ञ आणि गुगलमधील वरिष्ठ अभियंता असलेल्या शीतल यांची निर्घृन हत्या करण्यात आली आहे. शीतल यांचे पती ५६ वर्षीय कर्क बी. व्रेझियन यांना याप्रकरणी अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

फॉक्स न्यूजच्या बातमीनुसार, मंगळवारी रात्री कॉब काउंटीमधील लॉरेल क्रीक ट्रेल परिसरातील निवासस्थानी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात शीतल आणि कर्क यांचा मुलगा जेसन व्रेझियनही (वय २३) या गोळीबारात जखमी झाला. जखमी अवस्थेतच तो कसाबसा घराच्या बाहेर पडला आणि त्याने शेजाऱ्यांकडे मदत मागितली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीबद्दलची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी घराची पाहणी केली असताना ५६ वर्षीय शीतल व्रेझियन मृतावस्थेत आढळून आल्या. तर त्यांचे पती कर्क व्रेझियन यांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. ही घटना कौटुंबिक हिंसाचाराची असून त्याचा धोका इतरांना झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

कौटुंबिक वादातून हत्या

कर्क व्रेझियनवर खून, गंभीर हल्ला आणि गुन्हा करताना बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याला कॉब काउंटी प्रौढ कारावासात ठेवण्यात आले आहे. कौटुंबिक वादातून गोळीबार करण्यात आला. मात्र हत्येमागील हेतू अद्याप समोर आलेला नाही.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, एका शेजाऱ्याने सांगितले की, मुलाच्या पाठीत गोळी लागल्यानंतर तो जखमी अवस्थेतून घरातून पळत बाहेर आला. त्याने शेजारच्या घरात मदत मागण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे दार बंद असल्यामुळे तो पुढच्या घरात धावत गेला. तिथल्या घरमालकाने त्याला घरात घेतले. रुग्णवाहिका येईपर्यंत त्यांनी त्याच्यावर प्रथमोपचार करत रक्तस्त्राव थांबविण्यात मदत केली.

शीतल व्रेझियन कोण होत्या?

जॉर्जिया टेकच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या शीतल व्रेझियन या गुगलमध्ये अभियांत्रिकी प्रमुख होत्या. तंत्रज्ञान क्षेत्रात दोन दशकांहून अधिकचा अनुभव त्यांच्याकडे होता. गुगलमध्ये येण्यापूर्वी त्यांनी होम डेपोच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी मोबाइल आणि डिजिटल परिवर्तन उपक्रमाचे नेतृत्व केले होते.

शीतल यांच्या व्यावसायिक प्रोफाइलनुसार, अमेरिकेत स्थायिक होण्यापूर्वी त्यांनी इंग्लंड, भारत आणि घाना येथे काही काळ घालवला होता. त्यांनी १९९४ मध्ये जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायन्सची पदवी मिळवली होती.