अमेरिकेतल्या मॅसाचुसेट्स मध्ये भारतीय वंशाच्या १७ वर्षीय अर्जुन नावाच्या मुलाने त्याच्या आईची आणि भावाची हत्या केली आहे. अॅक्टन या शहरात राहणाऱ्या अर्जुनला बुधवारी पोलिसांनी अटक केली. अर्जुनवर त्याच्या ४५ वर्षीय आईची आणि १४ वर्षांचा भाऊ सिद्धार्थची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर हत्या, मारहाण, मोटर वाहन चोरी असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नेमकी घटना काय घडली?

अर्जुन अरविंद हा १७ वर्षीय मुलगा अॅक्टनच्या बॉक्सबोरो रिजनल स्कूलमध्ये विद्यार्थी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी त्याने त्याच्या घरात त्याच्या आईवर आणि लहान भावावर प्राणघातक हल्ला केला. तसंच नंतर तो आईची होंडा अकॉर्ड ही कार घेऊन पळून गेला. अॅक्टन पोलिसांचे प्रमुख डगलस स्टर्निलिओ यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले मंगळावारी अॅक्टनच्या मार्था लेन भागातल्या एका घरात एका महिलेचा आणि तिच्या मुलाचा मृतदेह सापडला. हे ठिकाण बोस्टनहून ४८ किमी दूर आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

मंगळवारी नेमकं काय घडलं?

मंगळवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास एक ट्यूटर या कुटुंबाच्या घरी गेली. पण दरवाजा कुणी उघडला नाही. ज्यानंतर तिने अर्जुनच्या वडिलांना म्हणजेच अरविंद यांना फोन केला. अर्जुनच्या वडिलांनी पत्नीला फोन केला पण काहीही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर त्यांनी अॅक्टन पोलिसांना फोन केला, माझं कुटुंब सुरक्षित आहे ना? हे पाहू शकता का याची विनंती केली. ज्यानंतर हत्येची घटना उघडकीस आली. अर्जुनच्या वडिलांनी सांगितल्यानुसार मंगळवारी सकाळी त्यांची आणि त्यांच्या पत्नीची भेट झाली होती. तर दुपारी ते सिद्धार्थला भेटले होते. अर्जुनच्या आईचा मृतदेह म्हणजेच सुधा यांचा मृतदेह बेसमेंटमध्ये पडला होता तर सिद्धार्थचा मृतदेह हा घराच्या पहिल्या मजल्यावर होता अशीही माहिती पोलिसांनी दिली.

कुटुंबाला संपवण्यासाठी AI कडे विचारणा

मिडलसेक्स काउंटी डिस्ट्रिक्ट अटॉर्नी ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार अर्जुन इंटरनेट आणि चॅटजीपीटीवर काय सर्च करत होता त्याची हिस्ट्री सापडली आहे. कुटुंबाला कसं संपवायचं याबाबत तो शोधत होता असं यातून समोर आलं आहे. कुटुंबाला कसं ठार मारायचं याबाबत तो AI ला विचारणा करत होता अशीही माहिती समोर आली आहे. AI चॅटबॉटकडे अर्जुनने गॉथिक कादंबरीसारखी गोष्ट सांग अशीही मदत मागितली होती असंही कळलं आहे. अर्जुन गॉथिक कादंबरीतलं पात्र होऊन प्रश्न विचारत होता असंही कळलं आहे.