न्यूयॉर्कमधील लोअर मॅनहॅटन येथील स्प्रिंग स्ट्रीट सबवे स्टेशनवर रविवारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. ट्रेनच्या धडकेत एक भारतीय वंशाची महिला आणि तिच्या मित्राचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

या घटनेबाबत असा दावा केला जात आहे की, भारतीय वंशाची ही महिला आणि तिचा मित्र हे दोघे रेल्वे रुळांवर बसले होते आणि अचानक आलेल्या सबवे ट्रेनची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, ते दोघे रुळांवर नेमकं कसे पोहोचले? अपघात आहे की आत्महत्या? याचा तपास आता अधिकारी करत आहेत. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

रविवारी पहाटे मॅनहॅटनमधील ‘स्प्रिंग स्ट्रीट’ स्थानकावर सबवे ट्रेनची धडक बसल्याने न्यू जर्सीमधील २४ वर्षीय मित्र-मैत्रिणीचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, न्यू जर्सी येथील भारतीय वंशाची तरुणी मलायका आणि सेअरव्हिल येथील तिचा मित्र नवम या दोघांना रविवारी पहाटे ३:१४ च्या सुमारास एका ट्रेनची धडक बसली. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

वृत्तानुसार, हे दोघे मित्र होते आणि २०२४ मध्ये रटगर्स विद्यापीठातून पदवीधर झाले होते. मलायका ही ‘अकॅडिया फार्मास्युटिकल्स’मध्ये काम करत होती. तिने नुकतीच टेम्पल युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर ऑफ फार्मसीची पदवी घेण्यास सुरुवात केली होती, तर नवम याने रटगर्स बिझनेस स्कूलमधून फायनान्समध्ये पदवी घेतली होती आणि एका कंपनीत डेटा ॲनालिस्ट म्हणून काम करत होता.

या घटनेबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत असं दिसत आहे की, ट्रेन येण्यापूर्वी काही वेळ हे दोघे रुळांवर बसले होते. त्या क्षणापूर्वी काय घडलं? किंवा ते दोघे रुळांवर कसे पोहोचले? हे या व्हिडीओवरून स्पष्ट होत नाही. त्यामुळे नेमका घटनाक्रम अद्याप स्पष्ट झालेला नाही.

दरम्यान, ‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या एका वृत्तानुसार, त्या दोघांपैकी एक जण आधी रुळांवर पडला किंवा चढला असावा. त्यानंतर दुसरा त्याला मदत करण्यासाठी खाली उतरला असावा असा अंदाज लावला जात आहे. मात्र, नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे आता या घटनेची चौकशी केली जात आहे. तसेच त्या दोघांनी मद्यपान केलं होतं का? त्यामुळे त्यांना रेल्वे आल्याची जाणीव वेळेत झाली नाही का? याचाही तपास केला जात आहे.