समरकंद (उझबेकिस्तान)

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘‘ही युद्धाची वेळ नव्हे,’’ असा सल्ला शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना दिला. सध्या जगासमोर अन्नधान्य, खते आणि इंधन टंचाई या सर्वात मोठय़ा समस्या आहेत, असेही मोदी यांनी पुतीन यांच्या निदर्शनास आणले.

BJP Manifesto PM Modi
गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा
PM Modi Ramtek Sabha
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, “इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा…”
narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाच्या आठवणीने झाले भावूक?
Russia Ukraine War PM Narendra Modi
पुतिन, झेलेन्स्की यांच्याशी पंतप्रधान मोदींची चर्चा; लोकसभा निवडणुकीनंतर दौरा करण्यासाठी निमंत्रण

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती. शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) २२वी वार्षिक परिषद येथे झाली. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या द्विपक्षीय चर्चेत पंतप्रधानांनी युक्रेन युद्धाबाबत चिंता व्यक्त केली. ‘‘आपण युद्धाबाबत दूरध्वनीवरही चर्चा केली आहे. आता शांततेच्या मार्गाने तोडगा कसा काढता येईल, यावर चर्चा करण्याची संधी प्रत्यक्ष भेटीमुळे मिळाली,’’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यावर, ‘‘युद्धाबाबतची तुमची चिंता मी समजू शकतो. युद्ध लवकरात लवकर संपवण्याची आमचीही इच्छा आहे. मात्र युक्रेनने चर्चेत रस दाखवलेला नाही,’’ असे पुतिन यांनी मोदींना सांगितले.

रशियाचे अध्यक्ष पुतिन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी आणि शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्य देशांचे प्रमुख या वार्षिक परिषदेत सहभागी झाले आहेत.

युक्रेनवरील हल्ल्यासंदर्भात भारताने अद्याप रशियाबद्दल निषेधाचा सूर काढलेला नाही. मात्र या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी भारताची युद्धविरोधी भूमिका स्पष्ट केली. चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांनीही गुरुवारी पुतिन यांच्याकडे अशीच चिंता व्यक्त केली होती.

दरम्यान, पुतिन यांच्याशी चर्चेपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी या परिषदेत करोना महासाथीनंतरच्या जागतिक अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. करोनानंतरची परिस्थिती आणि युक्रेनमधील संघर्षांमुळे जगापुढे आर्थिक आव्हाने आहेत. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. ती पूर्वपदावर आणण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले. भारताच्या आर्थिक विकासाचा संदर्भ देऊन मोदींनी सांगितले की, भारत जागतिक उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण आणि तैवान सामुद्रधुनीत चीनच्या आक्रमक लष्करी भूमिकेमुळे भू-राजकीय तणाव आणि गोंधळाच्या काळात आठ देशांच्या प्रभावशाली गटाची ही परिषद होत आहे. परिषदेच्या आवारात उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्जियोयेव यांनी पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत केले.

मोदी काय म्हणाले?

अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचे आव्हान सध्या जगासमोर आहे. करोना महासाथ आणि युक्रेनमधील संघर्षांमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा संकट निर्माण झाले आहे. त्यासाठी लवचीक पुरवठा साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उत्तम संपर्क यंत्रणा आणि देशादेशांतील परस्पर आयात-निर्यातीची प्रक्रियाही सुलभ करणे महत्त्वाचे आहे.

पुतीन काय म्हणाले?

युद्धाबाबतची तुमची (मोदी) चिंता मी समजू शकतो. युद्ध लवकरात लवकर संपवण्याची आमचीही इच्छा आहे. मात्र युक्रेनने चर्चेत रस दाखवलेला नाही.

व्यापारात वाढ

दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढत असल्याबाबत पुतीन यांनी समाधान व्यक्त केले. ‘‘भारताने रशियातून खतांची आयात आठ पटींनी वाढवली आहे. त्याचा भारतातील कृषीक्षेत्राला निश्चितच लाभ होईल,’’ असे पुतीन म्हणाले. कच्च्या तेलाबाबतही भारत हा चीननंतर रशियाचा दुसरा मोठा आयातदार देश झाला आहे.

 ‘भारताचा विकास दर अधिक

भारताचा आर्थिक विकास दर ७.५ टक्के असून तो भविष्यात जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपेक्षा अधिक असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. अन्न आणि ऊर्जा सुरक्षा संकटावर मात करण्यासाठी लवचीक पुरवठा साखळीची गरजही त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षपद भारताकडे

शांघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्षपद वर्षभरासाठी भारताकडे आले आहे. समरकंदमध्ये झालेल्या परिषदेत उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिरझोवेव यांनी संघटनेची धुरा पंतप्रधान मोदींकडे सोपवली. हे अध्यक्षपद फिरते असते. अध्यक्षपद असलेल्या देशात परिषद घेण्याचा प्रघात असल्याने २०२३ची वार्षिक परिषद भारतात होईल.