सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युरोपात दौरा चालू आहे. या दौऱ्यातील नियोजनानुसार दुसऱ्या टप्प्यावर म्हणजेच स्लोव्हाकियात त्यांचं आगमन झालं आहे. स्लोव्हाकियाच्या स्वतंत्र्यानंतर म्हणजेच १९९३ सालानंतर देशाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. स्लोव्हाकियाची राजधानी ब्राटिस्लाव्हियात त्यांचा दोन दिवस मुक्काम असणार आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि स्लोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष पिटर पेलेग्रिनी, तसेच पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध दृढ व्हावेत हा या भेटीचा महत्त्वाचा उद्देश असल्याने स्लोव्हकियातील उद्योजकांचीदेखील ते भेट घेणार आहेत.

स्लोव्हाकिया दौऱ्याबाबत मोदींची X पोस्ट

या भेटीच्या माध्यमातून नवीन संबंध प्रस्थापित होतील अशी माहिती मोदींनी त्यांच्या एक्स पोस्टवरून दिली. एक्स पोस्टवर मोदी लिहितात, “राष्ट्राध्यक्ष पेलेग्रीनी आणि पंतप्रधान फिको यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होणार आहेत. विकासाच्या दृष्टीने भारत आणि स्लोव्हाकिया हे दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील.”

मीठ व ब्रेड देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत

भारताच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार स्लोव्हाकियाचे परराष्ट्रमंत्री ज्युराज ब्लॅनर यांनी स्लोव्हाकियातील परंपरेनुसार ब्रेड आणि मीठ देऊन पारंपरिक पद्धतीने मोदींचे स्वागत केले. स्लोव्हाकियातील परंपरेनुसार एखाद्या मोठ्या व्यक्तीचे स्वागत करताना ही प्रथा पाळली जाते. स्थानिक मान्यतेनुसार ब्रेड हा पाश्चिमात्य आहारातील प्रमुख घटक, तर मीठ हे निष्ठेचं प्रतिक आहे. त्यामुळे येणाऱ्या महत्त्वाच्या अतिथींचं स्वागत करण्यासाठी ब्रेड आणि मीठ या गोष्टी दिल्या जातात.

मोदींनी ही भेट फारच ऐतिहासिक असल्याचे सांगून दोन्ही देशातील संबंधांना या भेटीमुळे चालना मिळणार असल्याचे सांगितले आहे. या भेटीमुळे आपल्या देशातील महत्त्वाच्या क्षेत्रांना लाभ होणार असून स्लोव्हाकियातील राजकीय नेते तसेच उद्योजकांमध्येही सकारात्मक चर्चा घडणार असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. परराष्ट्र मंत्रालयाने असेही सांगितले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्लोव्हाकियातील एप्रिल २०२५चा दौरा आणि राष्ट्राध्यक्ष पेलेग्रीनी यांचा २०२६च्या फेब्रुवारीतील भारत ‘ए आय इमपॅक्ट समीट’मधील दौरा, या दोन दौऱ्यांनंतर हा दौरा अतिशय महत्त्वाचा दौरा ठरणार आहे.

व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल उत्पादन, रेल्वे निर्मिती, आणि नवीन तंत्रज्ञान हे भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील चर्चेचे विषय आहेत. या भेटीमुळे युरोपीय संघासोबतही चांगले संबंध प्रस्थापित होतील असा विश्वास नवी दिल्लीतून व्यक्त केला जातोय.

स्लोव्हाकियातून मोदी पुन्हा फ्रान्सला परतणार

या दौऱ्यात सर्वप्रथम पंतप्रधानांनी फ्रान्सला भेट दिली होती. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा पार पडली. फ्रान्समधील भेटीदरम्यान निसमधील ‘भारत इनोव्हेट्स’ या कार्यक्रमातदेखील पंतप्रधान सहभागी झाले होते. स्लोव्हाकियानंतर पुन्हा मोदी फ्रान्सला जाऊन जी-७ समीटमध्ये सहभागी होतील. ही बैठक यावेळी फ्रान्समधील इवियन शहरात १६ व १७ जून रोजी होणार आहे. आंतरराष्ट्रीय समन्वय, आर्थिक विकास तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता हे या बैठकीतील चर्चेचे विषय असणार आहेत. पंतप्रधान यांच्या या दौऱ्याचा शेवट १८ जूनला पॅरीसमध्ये होणार असून ते विवाटेक २०२६ या महोत्सवात सहभागी होणार आहेत.