Bangladesh: बांगलादेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चट्टोग्राम येथील भारताच्या सहाय्यक उच्चायुक्तालयात एका भारतीय प्रोटोकॉल अधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. नरेन धर (वय ३८) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. उच्चायुक्तालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील डेटा एंट्री खोलीच्या स्वच्छतागृहाच्या दरवाजासमोर धर यांचा मृतदेह आढळून आला आहे, अशी माहिती बांगलादेश पोलिसांनी स्थानिक माध्यमांना दिली आहे.
मूळचे चंदीगडचे रहिवासी
बांगलादेशातील bdnews24.com ने याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, चट्टोग्राम येथील बंदर शहरातील खुलशी भागातील झाकीर हुसेन मार्गावर भारताचे सहाय्यक उच्चायुक्तालय कार्यालय आहे. कार्यालयाच्या आवारातच मंगळवारी नरेन धर यांचा मृतदेह आढळून आला. धर मूळचे चंदीगडचे रहिवासी होते. बांगलादेशातील भारतीय दूतावासात सहाय्यक प्रोटोकॉल अधिकारी म्हणून कार्यरत होते, अशी माहिती समोर आली आहे.
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू?
चट्टोग्राम महानगर पोलिसांचे जनसंपर्क सहाय्यक आयुक्त अमिनूर रशीद यांनी या घटनेबाबत bdnews24.com ला माहिती दिली आहे. सहाय्यक उच्चायुक्तालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील डेटा एंट्री खोलीच्या स्वच्छता गृहाच्या दरवाजासमोर धर यांचा मृतदेह आढळून आला. धर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालातूनच धर यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
संशयास्पद बाबी आढळल्या नसल्याची डॉक्टरांची माहिती
घटनेची माहिती मिळताच चट्टोग्राम पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करण्यात आला. कायदेशीर सोपस्कर पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चट्टोग्राम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या शवागारात पाठविण्यात आला आहे. रुग्णालयात आणण्यापूर्वीच धर यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती हॉस्पिटल संचालक ब्रिगेडियर जनरल मोहम्मद तस्लीम उद्दीन यांनी स्थानिक माध्यमांना दिली आहे. मृतदेहावर कोणत्याही जखमांच्या खुणा किंवा संशयास्पद बाबी आढळून आल्या नाहीत, असेही ब्रिगेडियर जनरल मोहम्मद यांनी स्पष्ट केले.
शवविच्छेदन अहवाल प्रलंबित
मृत प्रोटोकॉल अधिकारी नरेंद्र धर यांच्या शवविच्छेदन अहवाल अद्याप प्रलंबित असून, या अहवालातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येण्यास मदत होणार आहे. भारताकडून धर यांच्या मृत्यू प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह भारतीय सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जाईल, असे पोलीस अधिकारी इस्लाम यांनी ‘द डेली स्टार’शी बोलताना सांगितले.
