Cancer Patient Railway Emergency Quota : कर्करोगाच्या उपचारासाठी तातडीने प्रवास करावा लागणाऱ्या रुग्णांना भारतीय रेल्वेने महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशा रुग्णांना आणि त्यांच्याबरोबर प्रवास करणाऱ्या प्रवाशाला इमर्जन्सी कोटा अंतर्गत कन्फर्म रेल्वे तिकीट मिळू शकते. शुक्रवारी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.
राज्यसभेचे खासदार तेराश गोवाला आणि बाबूभाई जेसंगभाई देसाई यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उत्तर देत होते. उपचारासाठी लांबचा प्रवास करण्याची गरज असलेल्या गंभीर आजारी रुग्णांना रेल्वेची कन्फर्म तिकिटे प्राधान्याने देण्याची काही व्यवस्था भारतीय रेल्वेकडे आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी स्वतंत्र इमर्जन्सी कोटा
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, या सुविधेमुळे कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्याबरोबरच्या व्यक्तींना संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली काऊंटर्सद्वारे आरक्षित तिकिटे बुक करता येतात. उपचारासाठी तातडीने प्रवास करणाऱ्या कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी काही ठराविक गाड्यांमध्ये इमर्जन्सी कोटा राखीव ठेवण्यात आला आहे.
कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी काय करावे?
गंभीर आजाराच्या उपचारासाठी प्रवास करणाऱ्या रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय कागदपत्रांबद्दल आणि आपत्कालीन तिकीट वाटपाची सुविधा सर्व प्रकारच्या गाड्या व प्रवासाच्या श्रेणींसाठी उपलब्ध आहे का याबद्दलही विचारणा केली.
कोणती कागदपत्रे आवश्यक?
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना केंद्र किंवा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाद्वारे मान्यताप्राप्त रुग्णालय किंवा संस्थेच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेले सवलत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. एड्स रुग्णांच्या बाबतीत, हे प्रमाणपत्र अधिकृत अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी केंद्राकडून दिलेले असावे.
कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी आपत्कालीन कोट्याअंतर्गत किती जागा राखीव?
प्रत्येक रेल्वेगाडीत कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या सहप्रवाशांसाठी इमर्जन्सी कोट्यात एकूण १२ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये फर्स्ट क्लाससाठी २ जागा, एसी २-टायरसाठी २ जागा, एसी ३-टायरसाठी २ जागा आणि एसी चेअर कारसाठी २ जागा, तसेच स्लीपर क्लासमध्ये ४ बर्थचा समावेश आहे.
इतरांसाठी असलेला इमर्जन्सी कोटा
कर्करोगाच्या रुग्णांसाठी असलेल्या विशेष कोट्याव्यतिरिक्त हाय ऑफिशियल रिक्विझिशन धारक ज्यामध्ये केंद्र सरकारचे मंत्री आणि सर्वोच्च न्यायालय किंवा विविध राज्यांच्या उच्च न्यायालयांचे न्यायाधीश यांचा समावेश असतो तसेच संसद सदस्य यांच्या प्रवासासाठीही इमर्जन्सी कोट्यात मर्यादित जागा राखीव असतात.
