नवी दिल्ली : देशात झारखंडमधील हजारीबाग शहरातील रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय शनिवारी सुरू करण्यात आले असून वाय फाय सुविधा असलेले ते सहा हजारावे स्थानक ठरले आहे.

रेल्वेने वायफाय सुविधा मुंबई रेल्वे स्थानकावर २०१६ मध्ये मोफत सुरू केली होती. त्यानंतर पाच हजार स्थानकांवर ती उपलब्ध करण्यात आली. त्यात मिदनापूर हे पाच हजारावे रेल्वे स्थानक होते. १५ मे रोजी ओडिशातील अंगुल जिल्ह्य़ात जरपडा येथे  वायफाय सेवा सुरू करण्यात आले. वायफाय सेवा रेल्वे स्थानकांवर मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे भारत सरकराच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाला पाठबळ मिळाले आहे. ग्रामीण व शहरी नागरिक आता डिजिटल साधनांचा वापर करू शकतात. वायफाय सुविधा सध्या सहा हजार रेल्वे स्थानकांवर मोफत देण्यात आली आहे.

रेल टेल या सार्वजनिक मालकीच्या कंपनीकडून ही सेवा रेल्वेवर आर्थिक भार पडू न देता दिली जात आहे. यात गुगल व दूरसंचार मंत्रालय, पीजीसीआयएल, टाटा ट्रस्ट यांचे सहकार्य आहे.