भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे,  फर्स्ट क्लासच्या एसी डब्यातल्या ब्लँकेट्सना आता कव्हर घातली जाणार आहेत. अप आणि डाऊन ट्रेनसाठी वेगवेगळ्या रंगाचे कव्हर्स  घालण्यात येणार आहेत अशीही माहिती पुढे येते आहे. भारतीय रेल्वेतर्फे हे आदेश लागू करण्यात आले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी अशीही माहिती समोर येत होती की रेल्वेमध्ये दिलं जाणारं ब्लँकेट बंद होणार आहे. मात्र आता या सगळ्या ब्लँकेटसाठी कव्हर घालण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे.

रेल्वेच्या एसी डब्यांचं तापमान २३ ते २५ डिग्रीवर सेट केलं जाईल ज्यामुळे ब्लँकेटची गरजच भासणार नाही अशीही एक चर्चा झाली होती. मात्र त्यावर एकमत झालं नाही, अखेर रेल्वे मंत्रालयानं ब्लँकेटला कव्हर घालण्याचा निर्णय घेतला आहे.

६ महिन्यांनी धुतले जातात ब्लँकेट!
कॅगनं दिलेल्या अहवालानुसार रेल्वेच्या एसी डब्यात मिळणारे ब्लँकेट ६ महिने ते ३ वर्षे एवढ्या कालवाधीपर्यंत धुतलेले नसतात. प्रवाशांनी खराब ब्लँकेटबाबत तक्रारी करूनही त्याचा काहीही उपयोग होत नाही असंही कॅगच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या प्रवाशांना फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसीमध्ये एक चादर, एक उशी आणि एक ब्लँकेट दिलं जातं. या संपूर्ण सेटचं भाडं तिकीटातच घेण्यात आलेलं असतं.

काही ट्रेन्समध्ये २५ ते ५० रूपये जास्त शुल्क भरून हा सेट दिला जातो. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये प्रवाशांनी अनेकदा अस्वच्छ ब्लँकेट दिलं जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर कॅगच्या अहवालात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

रेल्वेकडे होते २ पर्याय
आत्ताच्या ब्लँकेटची धुलाई वेळच्या वेळी करण्यात यावी हा एक पर्याय होता आणि ब्लँकेटला कव्हर घातलं जावं हा दुसरा पर्याय होता. यापैकी रेल्वे खात्यानं दुसरा पर्याय स्वीकारला आहे. तसंच या ब्लँकेटची लांबी रूंदीही कमी करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. एका ब्लँकेटच्या धुलाईसाठी सध्या ५५ रूपये इतका खर्च येतो. हा खर्च कमी करण्यावरही रेल्वे खातं विचार करतं आहे अशीही माहिती समोर येते आहे.

रेल्वेत मिळणारे ब्लँकेट आणि त्यांची अवस्था अत्यंत वाईट असते अशा तक्रारी नागरिकांनी वारंवार केल्या होत्या. त्यानंतर आता रेल्वेच्या ब्लँकेटच्या पद्धतीत सुधारणा करण्यात येणार असून त्यांना कव्हर्स घातली जाणार आहेत.