नागपूर : भारतीय रेल्वेत आगामी २०२६-२७ आर्थिक वर्षात मनुष्यबळ सुसूत्रीकरणाचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे देशभरातील मंजूर मनुष्यबळापैकी दोन टक्के पदांची कपात करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे देशातील विविध विभागातील एकूण २९ हजार ६०८ पदे कमी होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

रेल्वे बोर्डाचे संचालक अमित सिंह मेहरा यांनी २४ एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व विभागीय रेल्वे, उत्पादन युनिट आणि अन्य विभागांतील पदांचे पुनर्वितरण आणि अनावश्यक पदे रद्द करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ‘एचआरएमएस’ पोर्टलमार्फत राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रेल्वे मंडळाने निश्चित केलेली उद्दिष्टे वार्षिक कार्यक्षमतेच्या सामंजस्य करारांमध्ये समाविष्ट केली आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागीय महाव्यवस्थापकांना त्याची पूर्तता करणे बंधनकारक आहे. तसेच वर्षअखेरीस मोठा ताण येऊ नये म्हणून ही प्रक्रिया तिमाही आधारावर पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे देशातील सर्व प्रमुख विभागीय मंडळांवर परिणाम होणार आहे. उत्पादन युनिट्समध्येही मनुष्यबळ कपातीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्सला २१४, रेल कोच फॅक्टरीला १४७, मॉडर्न कोच फॅक्टरीला २१७, बनारस लोकोमोटिव्ह वर्क्सला ११५ आणि पाटियाला लोकोमोटिव्ह वर्क्सला ६९ पदांचे सुसूत्रीकरण करावे लागणार आहे. रेल व्हिल फॅक्टरी आणि रेल्वे संशोधन व विकास संस्था (आरडीएसओ) यांनाही स्वतंत्र लक्ष्य देण्यात आले आहे. १ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेल्या मंजूर पदसंख्येच्या आधारे ही २ टक्के कपातीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. देशभरात मंजूर पदसंख्या १४ लाख ८० हजार ४५५ इतकी असून, त्यानुसार हे सुमारे २९ हजार ६०८ पदांचे सुसूत्रीकरण अपेक्षित आहे.

कामाचा ताण वाढण्याची शक्यता

आधीच रिक्त पदांचा प्रश्न गंभीर असताना नव्या धोरणामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढण्याची शक्यता ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे झोनल सरचिटणीस व ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लॉईज फेडरेशनचे संयुक्त सचिव संजय सोनारे यांनी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर, मध्य रेल्वेला सर्वाधिक फटका

उत्तर रेल्वेला सर्वाधिक ३३०३ पदांचे सुसूत्रीकरण करावे लागणार आहे. त्याखालोखाल मध्य रेल्वेला २४९२, पश्चिम रेल्वे २३३९, पूर्व रेल्वे २५४४ आणि दक्षिण रेल्वेला १९०६ पदांचे लक्ष्य देण्यात आले आहे. ईशान्य सीमांत रेल्वेला १४४६, उत्तर-मध्य रेल्वेला १६६७, पूर्व-मध्य रेल्वेला १९२२, पश्चिम-मध्य रेल्वेला १३११ आणि दक्षिण-पश्चिम रेल्वेला ८९३ पदांचे सुसूत्रीकरण करावे लागणार आहे. तसेच दक्षिण-मध्य रेल्वेला १२५५, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला १९०८, तर दक्षिण पूर्व रेल्वेला ११८४ पदांवर पाणी सोडावे लागणार आहे.