देशातील सौर उर्जेवर चालणारी पहिली डीईएमयू अर्थात (डिझेल इलेक्ट्रॉनिक मल्टिपल युनिट) ट्रेन आजपासून सुरू करण्यात आली. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. सौर उर्जा डेमू ट्रेनमध्ये सहा ट्रेलर कोच आहेत. तसंच या ट्रेनमुळे २१ हजार लीटर डिझेलची बचत होणार आहे. तर दरवर्षी १२ लाख रूपयांची बचत होणं शक्य आहे अशी प्रतिक्रिया रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे.

चेन्नईतल्या इंटीग्रील कोच फॅक्ट्रीमध्ये या ट्रेनला सौर उर्जेसाठीचं पॅनल लावण्यात आलं. या ट्रेनच्या छतावर सौर पॅनल लावण्यात आलं आहे. यामुळे डब्यातले लाईट आणि पंखे चालू शकणार आहेत, प्रत्येक डब्याला १६ पॅनल लावण्यात आले आहेत, ज्यांची क्षमता ४.५ किलोवॅट आहे. प्रत्येक डब्यात १२० अँपियरच्या बॅटरी लावण्यात आल्या आहेत. या ट्रेनमुळे दरवर्षी २१ हजार लीटर डिझेल वाचू शकणार आहे. तसंच प्रत्येक डब्याच्या हिशोबानं दरवर्षी ९ टन कार्बन उत्सर्जनही कमी होणार आहे.

येत्या सहा महिन्यात सौर उर्जेवर चालणारे आणखी २४ डबे तयार करण्यात येणार आहेत. या ट्रेनमुळे निसर्गात पसरणारं प्रदूषणही थांबवण्यास बऱ्याच अंशी मदत होमार आहे. सौर उर्जेवर चालणाऱ्या ट्रेनमागे २५ वर्षात ३ कोटी रूपये वाचू शकतात असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिमला कालका टॉय ट्रेनसोबत कमी अंतर असलेल्या मार्गावर सौर उर्जेवर चालणाऱ्या ट्रेन चालवण्यात येतील. लांब पल्ल्याच्या काही ट्रेन्समध्ये एक किंवा दोन सोलार पॅनलचे डबे लावले जातील, राजस्थानातही या सौर उर्जेवर चालणाऱ्या ट्रेनची चाचणी घेण्यात आली आहे.

२०१६-१७ च्या रेल्वे बजेटमध्येच सौर उर्जेवर चालणाऱ्या ट्रेनचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानुसार आज पहिली ट्रेन रवाना करण्यात आली आहे. सौर उर्जेवर चालणाऱ्या या ट्रेनमुळेच इंधनाचीही बचत मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तर पर्यावरणात प्रदूषणही कमी प्रमाणात होण्यास हातभार लागणार आहे.