भारतीय रेल्वेचा नवीन ‘3 AC इकॉनॉमी कोच’ प्रवाशांच्या सेवेत दाखल!

प्रयागराज-जयपूर एक्सप्रेसला हा कोच जोडण्यात आला आहे; जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना जास्तीतजास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच विविध उपाययोजना केल्या जातात. आता भारतीय रेल्वेच्या या विकासात्मक प्रवासात नवीन एसी थ्री टायर इकॉनॉमी क्लास कोचचा देखील प्रवेश झाला आहे. या नवीन कोचने आजपासून आपली सेवा देण्यास सुरुवात केली आहे. प्रथमच, ट्रेन क्रमांक 02403 प्रयागराज-जयपूर एक्सप्रेसला हा कोच जोडण्यात आला आहे. 3-एसी कोचमधील 72 बर्थच्या तुलनेत नवीन एसी इकॉनॉमी कोचमध्ये 83 बर्थ आहेत.

तसेच, या कोचची भाडे रचना 3AC कोचपेक्षा 8 टक्के कमी आहे. त्यामुळे प्रवाशांना कमी पैशात प्रवासाचा चांगला अनुभव मिळणार आहे. उत्तर-मध्य रेल्वे झोनला भारतीय रेल्वेने अशात हे चार कोच दिले आहे. यामधील प्रवासासाठी तिकीट बुकींग २८ ऑगस्टपासून सुरू झालेली आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांना बऱ्याच सुविधा मिळणार आहेत. यामध्ये सात कोच असून, प्रत्येक कोचमध्ये सहा सीसीटीव्ही बसवलेले आहेत. सुरुवातीला, 50 नवीन 3AC इकॉनॉमी कोच वेगवेगळ्या झोनमध्ये सेवा देण्यासाठी तयार आहेत

प्रयागराजहून जयपूर स्पेशल ट्रेनमध्ये दिव्यांगांसाठी खास शौचालय देखील तयार करण्यात आले आहे. याचबरोबर करोनाच्या बचावासाठी ऑटोमेटिक वॉश बेसिन देखील आहे, ज्यावर पायाने दाबून पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय प्रत्येक सीटवर चार्जिंग पॉईंट आणि एसी कंट्रोलर देखील देण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indian railways launches new 3 ac economy coaches for passengers msr