Indian Railways Rules: लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासादरम्यान बहुतेक लोकांना खालच्या बर्थची बुकिंग हवी असते. ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये तीन बर्थ असतात. तिकीटे बुक करताना अनेक जण त्यातही प्रामुख्याने महिला आणि वृद्ध खालच्या बर्थची बुकिंग मिळवण्याचा प्रयत्न करतात. आता भारतीय रेल्वेने या खालच्या बर्थच्या बुकिंगबाबत एक महत्त्वाचा बदल केला आहे. तत्काळ तिकीट बुकिंग आणि आरक्षणाचे नियम बदलल्यानंतर रेल्वेने आता ट्रेनच्या बसण्याच्या पद्धतीबाबत नवीन नियम काढले आहेत.

आसनांसाठी विशेष नियम

रेल्वेने आगाऊ आरक्षणाचा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांपर्यंत कमी केला. बदल असूनही लोअर बर्थबाबत लोकांच्या अपेक्षा अपूर्णच राहिल्या. तिकीट बुकिंग करताना लोअर बर्थ प्रिफरन्स पर्याय निवडल्यानंतरही लोकांना लोअर बर्थ मिळत नाही. म्हणूनच रेल्वेने केलेले हे बदल समजून घेणे महत्त्वाचे आहे.

रेल्वेच्या नियमांनुसार, ४५ वर्षांवरील महिला, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ दिला जातो. असं असतानाही हे जागांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. तिकीट बुक करताना तुम्ही लोअर बर्थ सीटचा पर्याय निवडला तरीही ती उपलब्ध नसेल तर तुम्हाला मधली, वरची किंवा बाजूची सीट मिळेल. आता रेल्वेने यामध्ये एक मोठा बदल केला आहे. रेल्वेने तिकीट बुकिंग करताना लोअर बर्थ उपलब्ध असेल तरच बुक करा हा पर्याय सुरू केला आहे. आयआरसीटीसी वरून तिकीट बुक करताना लोअर बर्थ उपलब्ध असेल तरच बुक करा हा पर्याय दिला जातो. याअंतर्गत ट्रेनमध्ये खालचा बर्थ उपलब्ध असेल तरच तुमचे तिकीट बुक केले जाईल.

ट्रेनमध्ये झोपण्याचे नियम

रेल्वेने गाड्यांमध्ये झोपण्यासाठी नियमदेखील निश्चित केले आहेत. तुम्ही रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत तुमच्या सीटवर झोपू शकता. या काळात प्रवासी त्यांच्या नियुक्त सीटवर झोपू शकतात. इतर वेळी तुम्हाला तुमची सीट उघडण्याची परवानगी दिली जाणार नाही, त्यातही प्रामुख्याने मधला बर्थ. दिवसाच्या उर्वरित काळात प्रवाशांना बसण्याची परवानगी असेल.