खासगी कंपन्या चालवणार १८० भारत गौरव ट्रेन्स; रेल्वे मंत्री म्हणतात पर्यटनाला मिळेल चालना

भागधारक ट्रेनमध्ये फेरफार करतील आणि चालवतील आणि रेल्वे देखभाल, पार्किंग आणि इतर सुविधांमध्ये मदत करेल, असं वैष्णव यांनी सांगितलं.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी सांगितले की, पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने सरकार १८० ‘भारत गौरव’ गाड्या सुरू करण्याचा विचार करत आहे. ते म्हणाले की, रेल्वेने या उद्देशासाठी ३०३३ डबे राखीव ठेवले आहेत आणि नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी अर्ज मागवले आहेत.

“आम्ही ‘भारत गौरव’ गाड्यांचे वाटप केले आहे आणि ३०३३ डबे राखीव ठेवले आहेत. आम्ही आजपासून अर्ज घेणे सुरू करू. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भागधारक ट्रेनमध्ये फेरफार करतील आणि चालवतील आणि रेल्वे देखभाल, पार्किंग आणि इतर सुविधांमध्ये मदत करेल,” वैष्णव यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

पर्यटनाला चालना देणे हा या सेवेचा मुख्य उद्देश असल्याचे मंत्र्यांनी पुढे सांगितले. “हा पूर्णपणे नवीन विभाग आहे. ही नियमित रेल्वे सेवा नाही. ‘भारत गौरव’ ट्रेनचा मुख्य उद्देश पर्यटनाला चालना देणे हा आहे आणि त्याला अनेक पैलू आहेत,” ते म्हणाले. रामायण स्पेशल ट्रेनच्या कर्मचार्‍यांच्या पोशाखाशी संबंधित अलीकडील वादाबद्दल विचारले असता, वैष्णव म्हणाले की त्यांनी या भागातून धडा घेतला आहे.

हेही वाचा – साधूंच्या इशाऱ्यानंतर रामायण एक्सप्रेसमध्ये IRCTCने वेटर्सच्या पेहरावात केला बदल, पण…

“आम्ही त्यातून शिकलो आहोत. जेव्हा आपण संस्कृतीतील कोणत्याही मुद्द्याला सामोरे जातो तेव्हा त्यात अनेक संवेदनशील मुद्दे असतात. डिझायनिंग, खाद्यपदार्थ, पोशाख आणि इतर गोष्टींमध्ये आपण जाणीवपूर्वक लक्ष घातलं पाहिजे. त्यामुळे आपण हे शिक्षण घेऊन पुढे जायला हवे,” ते म्हणाले. तत्पूर्वी, भारतीय रेल्वेने काही लोकांकडून आक्षेप घेतल्यानंतर रामायण विशेष गाड्यांवरील आपल्या सेवा कर्मचार्‍यांचे भगवे पोशाख काढून घेतले. “सेवा कर्मचार्‍यांच्या व्यावसायिक पोशाखात पूर्णपणे बदल करण्यात आला आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहे,” असे रेल्वेने म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian railways to start 180 bharat gaurav trains to boost tourism minister ashwini vaishnaw vsk

ताज्या बातम्या