Indian Rupee History Gulf Countries: भारतीय रुपया हा आज भारताचं अधिकृत चलन असले तरी एकेकाळी आखाती देशांमधील व्यापारातही भारतीय रुपयाचा वापर केला जात होता. आखाती देशांनी स्वतःची चलनव्यवस्था स्वीकारण्यापूर्वी भारत आणि या प्रदेशातील आर्थिक संबंध किती घनिष्ठ होते, याची माहिती आता एका नव्या पुस्तकातून समोर आली आहे. संयुक्त अरब अमिरातीतील भारताचे माजी राजदूत नवदीप सिंग सुरी यांनी आपल्या नव्या पुस्तकातून भारत आणि आखाती देशांमधील ऐतिहासिक, आर्थिक आणि राजनैतिक संबंधांचा आढावा घेतला आहे, याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.

‘ब्रिजिंग द गल्फ : द रीमेकिंग ऑफ इंडिया-यूएई रिलेशन्स’ असं या पुस्तकाचं नाव आहे. ‘गल्फ न्यूज’च्या २९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या पुस्तकाचं प्रकाशन २५ ऑक्टोबर रोजी करण्यात आलं. सुरी यांनी राजनैतिक सेवेदरम्यान मिळवलेला अनुभव, ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास आणि भारत-यूएई संबंध घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या व्यक्तींशी केलेल्या चर्चांच्या आधारे हे पुस्तक लिहिलं आहे.

आखाती देशांमध्ये भारतीय रुपया कसा वापरला जायचा?

या पुस्तकातील ‘गोल्ड फीव्हर’ या प्रकरणात १९५० आणि १९६० च्या दशकांतील भारत आणि दुबई यांच्यातील सोन्याच्या व्यापाराचा आढावा घेण्यात आला आहे. त्या काळातील आर्थिक परिस्थिती, भारतीय रुपयाचा वापर आणि त्यानंतर आखाती रुपयाची झालेली निर्मिती, तसेच पुढे आखाती देशांनी स्वतःची चलनव्यवस्था स्वीकारण्यापर्यंतचा प्रवास या प्रकरणात मांडण्यात आला आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळात मुंबई हे भारतापुरतंच नव्हे, तर आखाती प्रदेशातील काही भागांसाठीही महत्त्वाचं प्रशासकीय आणि व्यापारी केंद्र होतं. भारत आणि आखाती देशांमधील व्यापाराचे अनेक धागे मुंबईशी जोडलेले होते. विशेषतः मोत्यांच्या व्यापारामुळे भारतीय आणि अरब व्यापाऱ्यांमधील संबंध अधिक दृढ झाले. आखाती देशांतील काही व्यापारी कुटुंबांनी मुंबईत कार्यालयं आणि निवासस्थानेही उभारली होती.

माजी राजदूतांना पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली?

नवदीप सिंग सुरी यांनी २०१६ ते २०१९ या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिलं. सुरुवातीला २०१५ ते २०२५ या दशकातील भारत-यूएई संबंधांमधील महत्त्वाच्या घडामोडींवर पुस्तक लिहिण्याचा त्यांचा विचार होता.

“मी यूएईमध्ये भारताचा राजदूत म्हणून काम केलेल्या परिवर्तनशील काळावर तुम्ही पुस्तक का लिहिलं नाही, असा प्रश्न अनेक जण मला विचारायचे. कारण या विषयावर एकही गंभीर पुस्तक उपलब्ध नव्हतं,” असं सुरी यांनी ‘गल्फ न्यूज’शी बोलताना सांगितलं. मात्र, यूएईमधील वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चांमुळे त्यांना भारत आणि आखाती देशांमधील संबंधांचा ऐतिहासिक पाया अधिक खोलवर तपासण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी सुमारे दोन वर्षे संशोधन करून हे पुस्तक पूर्ण केलं.

सुषमा स्वराज यांच्यापासून अबू धाबीतील हिंदू मंदिरापर्यंत

या पुस्तकात केवळ व्यापार आणि चलनाचा इतिहास मांडलेला नाही, तर भारत-यूएई संबंधांतील महत्त्वाच्या राजनैतिक घडामोडींचाही समावेश आहे. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इस्लामिक सहकार्य संघटनेच्या बैठकीत घेतलेला सहभाग आणि अबू धाबीमध्ये ‘बीएपीएस’ हिंदू मंदिर उभारण्यासाठी करण्यात आलेले राजनैतिक प्रयत्न यांचाही आढावा घेण्यात आला आहे. याशिवाय, भारतातील अमिरातीच्या गुंतवणुकीशी संबंधित आव्हानं आणि संरक्षण, सुरक्षा, ऊर्जा व तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील वाढतं सहकार्य यावरही पुस्तकात चर्चा करण्यात आली आहे.

यूएईकडून नवदीप सिंग सुरी यांचा सन्मान

भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सुरी यांना ११ सप्टेंबर २०१९ रोजी यूएईचा ‘फर्स्ट क्लास ऑर्डर ऑफ झायेद II’ हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. सुरी यांच्या नव्या पुस्तकातून भारत आणि आखाती देशांमधील संबंध हे केवळ आधुनिक व्यापार किंवा राजनैतिक सहकार्यापुरते मर्यादित नसून, त्यांना शतकानुशतकांचा ऐतिहासिक पाया असल्याचं अधोरेखित होतं. भारतीय रुपया, सोनं आणि मोत्यांचा व्यापार यांसारख्या उदाहरणांमधून या संबंधांचा एक वेगळाच पैलू समोर येतो.