Indian Sailors Injured Hormuz Attack : ओमानच्या किनारपट्टीवर एमटी ऑन पीस या पनामाचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर मंगळवारी क्षेपणास्त्र हल्ला झाला. होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जात असताना झालेल्या या हल्ल्यात १२ क्रू मेंबर्स जखमी झाले असून, त्यामध्ये ११ भारतीय खलाशांचा समावेश आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
१९ कर्मचाऱ्यांपैकी १७ जण भारतीय नागरिक
जखमी कर्मचाऱ्यांना ओमानच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून, ओमानमधील खसाब येथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या जहाजावरील एकूण १९ कर्मचाऱ्यांपैकी १७ जण भारतीय नागरिक आहेत. भारताने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून मदतीबद्दल ओमान प्रशासनाचे आभार मानले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलं?
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, या भागात व्यापारी जहाजांवर होणारे सततचे हल्ले ही अत्यंत चिंतेची बाब असून, शांतता आणि स्थिरतेसाठी हे हल्ले त्वरित थांबवणं आवश्यक आहे. “या प्रदेशातील व्यापारी जहाजे, खलाशी आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं थांबलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरील दळणवळण आणि व्यापार लवकरात लवकर पूर्ववत झाला पाहिजे”, असं मंत्रालयाने म्हटलं आहे.
‘एमटी ऑन पीस’वरील हा हल्ला होर्मुझच्या सामुद्रधुनी आणि आसपासच्या परिसरात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये झालेल्या वाढीचाच एक भाग आहे. रॉयटर्सने ५ ऑक्टोबर रोजी दिलेल्या वृत्तानुसार, ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात कुवेतचे एमटी काझिमा ३ आणि लायबेरियाचे ‘लिप्सी’ या जहाजांसह किमान सात टँकरवर हल्ले झाले आहेत. या जलमार्गावरून होणारी कच्च्या तेलाची वाहतूक युद्धपूर्व पातळीच्या जवळ पोहोचली असतानाही हे हल्ले सुरूच आहेत.
या संघर्षात भारतीय खलाशीही बळी पडत आहेत. रॉयटर्सच्या माहितीनुसार, जुलै महिन्यात इराणच्या क्रूझ क्षेपणास्त्रांनी ओमानच्या सागरी हद्दीतून जाणाऱ्या ‘एमटी मोम्बासा’ आणि ‘एमटी अल बहिया’ या संयुक्त अरब अमिरातीशी संबंधित दोन टँकर्सना लक्ष्य केलं होतं. या हल्ल्यात एक भारतीय कर्मचारी ठार झाला होता, तर १० जण जखमी झाले होते.
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जहाजांवर होणारे हल्ले तीव्र झाले आहेत. रॉयटर्सने ९ सप्टेंबरच्या घटनांचं वर्णन युद्ध सुरू झाल्यापासून दोन्ही बाजूंनी केलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे हल्ले असं केलं आहे. ९ सप्टेंबर रोजी अमेरिकेने इराणचे पाच तेल टँकर्स बुडवल्यानंतर, इराणने सामुद्रधुनीजवळ १० जहाजांवर हल्ला केल्याचा दावा केला होता, ज्यामध्ये किमान एक खलाशी ठार आणि एक जण बेपत्ता झाला होता.
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील एकूण तेल आणि द्रवीभूत नैसर्गिक वायू पुरवठ्यापैकी सुमारे एक पंचमांश (१/५) भागाची वाहतूक होते. या मार्गावरील अडथळ्यांमुळे तेलाच्या किमतींवर परिणाम होत असून, जहाजांचा वाहतूक खर्च वाढत आहे आणि ऊर्जा पुरवठा धोक्यात आला आहे.
