Indian Sailors Trapped Pakistan Karachi Port : पाकिस्तानमधील कराची बंदरात सहा भारतीय खलाशी गेल्या सात महिन्यांपासून अडकून पडल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. जहाज कंपनी आणि बंदर प्रशासन यांच्यातील वादामुळे या खलाशांना अडवून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले असून जहाजाचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. या परिस्थितीमुळे खलाशांना कुटुंबीयांशी नियमित संपर्क साधणंही कठीण झालं आहे. या सहाही भारतीयांची सुरक्षित सुटका करून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
अडकलेल्या खलाशांमध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील मर्चंट नेव्ही अधिकारी विनीत किशोर मिश्रा यांचाही समावेश आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान, राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे मदतीची विनंती केली आहे.
कंपनी आणि कराची बंदर प्रशासनातील वादाचा फटका भारतीय खलाशांना?
मिश्रा यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणस्थित ‘केव्हर शिपिंग कंपनी’मध्ये काम सुरू केलं. त्यानंतर कंपनीच्या जहाजातून ओमानहून प्रवास करत हे जहाज १७ एप्रिल २०२६ रोजी कराची बंदरात पोहोचलं. जहाज कंपनी आणि कराची बंदर प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर जहाजाला ताब्यात ठेवण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर जहाजाचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आणि भारतीय कर्मचाऱ्यांचे पासपोर्टही जप्त करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
या वादात भारतीय खलाशांची कोणतीही थेट भूमिका नसताना त्यांना त्याचे परिणाम का भोगावे लागत आहेत, असा सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. जहाजातून अधिकृतपणे काम सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करून मायदेशी परतण्याची परवानगीही विनीत मिश्रा यांना मिळालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांचा नोकरीचा करार संपला असला, तरी परतीचा मार्ग अद्याप स्पष्ट झालेला नाही.
१५ दिवसांतून एकदाच कुटुंबीयांशी संपर्क
जहाजावरील परिस्थितीमुळे खलाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं आहे. जहाजावर नियमित वीजपुरवठा नसल्याने आणि मोबाइल नेटवर्क मिळवण्यात अडचणी येत असल्याने कुटुंबीयांशी संपर्क साधणं कठीण झालं आहे. साधारण १५ दिवसांतून एकदाच बोलणं शक्य होत असल्याचा दावा मिश्रा यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विनीत मिश्रा यांना मर्चंट नेव्हीमध्ये काम करण्याचा जवळपास दहा वर्षांचा अनुभव आहे. फेब्रुवारी महिन्यात ते कामासाठी परदेशात गेले होते. मात्र, काही महिन्यांचं काम करून परतण्याची अपेक्षा असताना त्यांना या परिस्थितीत अडकून राहावं लागत असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
पत्नी आणि दोन लहान मुलांना परतीची प्रतीक्षा
विनीत मिश्रा यांच्या पत्नी नेहा मिश्रा आणि त्यांचे वडील ललित किशोर मिश्रा हे त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. ललित किशोर मिश्रा हे भारतीय लष्करातून निवृत्त झाले आहेत. विनीत आणि नेहा यांना दोन लहान मुलं असून, ती आपल्या वडिलांच्या परतीची वाट पाहत आहेत. कुटुंबीयांशी संपर्क मर्यादित असल्यामुळे जहाजावरील परिस्थितीची नियमित माहिती मिळत नाही. विनीत यांची तब्येत कशी आहे, त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि ते भारतात कधी परतणार, याबाबत कुटुंबीयांना निश्चित माहिती मिळत नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
भारतीय दूतावासाकडे मदतीची मागणी
विनीत मिश्रासह पाकिस्तानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी आता थेट पंतप्रधान, राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे साकडे घातले आहे. भारतीय राजनैतिक मिशनशी संपर्क साधून मदतीचे आश्वासन मिळाले असले, तरी प्रत्यक्ष सुटका अद्याप झालेली नाही. स्थानिक आमदार व खासदारांमार्फतही हा प्रश्न केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत.
जहाज कंपनी आणि बंदर प्रशासन यांच्यातील वाद काहीही असला, तरी भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परतण्याची संधी मिळावी, ही कुटुंबीयांची प्रमुख मागणी आहे. त्यांचे पासपोर्ट कधी परत केले जाणार, त्यांना जहाजावरील सेवा अधिकृतपणे सोडण्याची परवानगी कधी मिळणार आणि भारतात परत आणण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत, याबाबत स्पष्टता देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
