Oman Coast Attack Indian Ship Gujarat Sailor Died : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय जहाजावर झालेल्या हल्ल्यात गुजरातमधील एका खलाशाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी होर्मूझच्या सामुद्रधुनीत भारतीय ध्वज असलेल्या ‘एमएसव्ही अल जूसुफी’ या मालवाहू जहाजावर हल्ला करण्यात आला. या जहाजावरील १४ भारतीय कर्मचाऱ्यांपैकी १३ जणांची ओमानच्या तटरक्षक दलाने सुखरूप सुटका केली. मात्र, जखमी झालेल्या एका खलाशाचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. याबद्दलचे सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या घटनेची माहिती दिली. मृत खलाशाचे नाव गंधार नाहिम अजिज असून ते गुजरातचे रहिवासी होते. या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त करताना सोनोवाल यांनी मृताच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
१३ खलाशांची सुटका; मृतदेह भारतात आणण्याचे प्रयत्न
जहाजावरील १३ कर्मचाऱ्यांची ओमानच्या तटरक्षक दलाने सुटका केली आहे. या सर्वांना आवश्यक मदत मिळावी आणि त्यांना लवकरात लवकर भारतात परत आणता यावे, यासाठी केंद्रीय मंत्रालय आणि ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत. मृत खलाशाचा मृतदेहही भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सोनोवाल यांनी सांगितले.
परराष्ट्र मंत्रालयाकडून हल्ल्याचा निषेध
भारतीय जहाजावरील हल्ल्याचा परराष्ट्र मंत्रालयानेही तीव्र निषेध केला आहे. ओमानमधील लिमाह परिसराच्या जवळ सोमवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचे मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. व्यापारी जहाजांवर अशा प्रकारचे हल्ले वारंवार होत असल्याबद्दल केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, सुटका करण्यात आलेल्या भारतीय खलाशांना आणि मृत कर्मचाऱ्याच्या पार्थिवदेहाला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी ओमानच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
पश्चिम आशियातील तणाव कमी करण्याचे भारताचे आवाहन
पश्चिम आशियातील संघर्ष तातडीने कमी करण्याचे आवाहन केंद्र सरकारने पुन्हा एकदा केले आहे. या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना गती देण्याची गरज असल्याचे भारताने म्हटले आहे. व्यापारी जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या प्रदेशातील जलमार्गांमधून जहाजांची आणि व्यापाराची मुक्त, निर्बंधमुक्त वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत झाली पाहिजे, अशी भूमिका परराष्ट्र मंत्रालयाने मांडली आहे.
