Indian Flagged Ship Attacked: ओमानमध्ये भारतीय जहाजांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली. या हल्ल्याचा परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी निषेध केला. व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त करत ही घटना अस्वीकार्य असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. जहाजावर असणारी भारतीय सदस्य सुखरुप असून, तात्काळ मदत देऊ केल्याने ओमानी प्रशासनाचे भारताने आभार मानले.
हल्ल्याचा भारताकडून निषेध
“ओमान किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर काल हल्ला करण्यात आला. ही घटना अस्वीकार्य आहे. या भागात व्यापारी जहाजांवर आणि नागरी वाहतुकीवर होणारे हल्ले चिंताजनक आहेत”, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. जहाजावर असणारे सर्व भारतीय सदस्य सुखरुप आहेत. जहाजावरील सदस्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी त्यांना मदत केल्याबद्दल आम्ही ओमानी प्रशासनाचे आभार मानतो, असे मंत्रालयाने म्हटले. तसेच, व्यापारी जहाजांवरील हल्ले आणि वाहतूक मार्गातील अडथळ्यांबाबत भारताने भूमिकाही स्पष्ट
केली.
भारताने स्पष्ट केली भूमिका
इराण युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा जागतिक इंधन आणि तेल पुरवठ्याला मोठा फटका बसला आहे. सर्वत्र उर्जा संकट उभं राहिले असताना भारतीय जहाजावर झालेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. “व्यापारी जहाजावर हल्ला करुन सदस्यांचा जीव धोक्यात घालण्याच्या घटनेचा भारत निषेध करते. व्यापारी वाहतुकीत अडथळा निर्माण केला जाऊ नये”, असे आवाहन देखील भारताने केले. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत अनेक एलपीजीवाहू टँकर्सनी होर्मुझ सामुद्रधुनी पार केली आहे.
१३ भारतीय जहाजं पर्शियन गल्फमध्ये अडकली
समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात २० हजार टन द्रव अवस्थेतील प्रोपेन आणि ब्युटेन गॅस घेऊन सायमी जहाज दीन दयाळ बंदरात दाखल झाले. याशिवाय एलपीजवाहू एनव्ही सनशाईन जहाज मंगळुरु बंदरात दाखल झाले. भारतीय जहाज होर्मुझमधून सुरक्षितपणे बाहेर पडावेत यासाठी परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रायल काम करत आहे. दरम्यान, सध्या १३ भारतीय जहाज पर्शियन गल्फमध्ये अडकून पडली असून, परवानगीची वाट पाहत आहेत.
