Pakistan Navy Help To Indian Ship: अरबी समुद्रात अडकलेल्या एका भारतीय जहाजाला पाकिस्तान नौदलाकडून मंगळवारी मानवतावादी मदत मिळाली. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ने सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. समुद्रात तांत्रिक बिघाडामुळे अडकून पडलेल्या या जहाजात सहा भारतीय आणि एक इंडोनेशियाचा नागरिक होता. पाकिस्तानी नौदलाकडून भारतीय क्रू सदस्यांना अन्न, औषधं आणि तांत्रिक मदत पुरविण्यात आली.

भारतीय जहाजात बिघाड

ओमान येथून भारताच्या दिशेने येणाऱ्या एमव्ही गौतम जहाजात तांत्रिक बिघाड झाला. यानंतर जहाजांवरील कर्मचाऱ्यांनी मुंबईतील सागरी बचाव आणि समन्वय केंद्राला संपर्क साधला. तांत्रिक बिघाड मोठा असल्याने समुद्राच्या मध्येच जहाज अडकून पडले. जहाजात सात क्रू सदस्य असल्याने तात्काळ मदत पोहोचवणे गरजेचे होते. यानंतर मुंबईतील केंद्राकडून पाकिस्तानी नौदलाला मदतीची विनंती केली.

पाकिस्तानकडून मदत

यानंतर पाकिस्तानी नौदलाकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला व अरबी समुद्रात अडकलेल्या जहाजावरील कर्मचाऱ्यांना इमर्जन्सी मदत देऊ केली. पाकिस्तानी नौदलाने जहाजावर अडकून पडलेल्या क्रू सदस्यांना अन्न, औषधं आणि तांत्रिक मदत देऊ केली, असे पाकिस्तानी लष्कराने प्रसिद्ध केलेल्या याबाबतच्या पत्रकात म्हटले आहे. गेल्या महिन्यात देखील पाकिस्तानी नौदलाने अरबी समुद्रात अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांचा समावेश असलेल्या १८ क्रू सदस्यांना मदत केली होती.

व्हिडीओ समोर

पाकिस्तानकडून राबविण्यात आलेल्या बचाव मोहिमेचा व्हिडीओ समोर आला असून, पाकिस्तानी नौदलाचे जवान भारतीय जहाजात अडकून पडलेल्या क्रू सदस्यांना मदत करताना दिसत आहेत.

ओमान येथून एमव्ही गौतम जहाज भारताच्या दिशेने येत होते. पण, अचानक जहाजात तांत्रिक बिघाड झाला. जहाजामधील तांत्रिक बिघाड मोठा असल्याने अडकून पडलेल्या सात क्रू सदस्यांना लवकर मदत मिळणे गरजेचे होते.