भारतीय मालकीच्या एका तेलवाहू जहाजाने सुरक्षितपणे होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली असून ते लवकरच मुंबईला पोहोचेल. त्याचवेळी इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ने भारताच्या दोन जहाजांवर गोळीबार केल्यामुळे भारताने शनिवारी इराणच्या राजदूतांना समन्स बजावून त्यांच्याकडे कठोर शब्दांमध्ये निषेध नोंदवला, तसेच व्यापारी जहाजांच्या सुरक्षेवर चिंताही व्यक्त केली. गोळीबारानंतर ही दोन्ही जहाजे सामुद्रधुनीतून माघारी देली.

देश गरिमा या तेलवाहू जहाजावर ३१ भारतीय नाविक आहेत. या जहाजाने शनिवारी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली असून ते २२ एप्रिलपर्यंत मुंबईला पोहोचेल असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. देश गरिमा हे जहाज ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या (एससीआय) भारताच्या मालकीचे असून मार्चपासून सामुद्रधुनी ओलांडणारे १०वे भारतीय जहाज आहे.

दुसरीकडे, सामनार हेरड हे अतिशय मोठे तेलवाहू जहाज आहे आणि जग अर्णव हे मोठे मालवाहू जहाज आहे. ही जहाजे होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न करत असत असताना रिव्होल्युशनरी गार्ड्सने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर ते पर्शियन आखातात माघारी फिरले.

या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या घटनेनंतर दिल्लीमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. याबरोबरच देश वैभव आणि देश विभोर या दोन तेलवाहू जहाजांनीही मार्ग बदलून ते पर्शियनच्या आखातात गेले. सध्या पर्शियन आखातात एकूण १४ भारतीय जहाजे आहेत.