इंग्लंडमध्ये १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी थेट इंग्लंडच्या राणीची हत्या करण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. या व्यक्तीचा हत्येची धमकी देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर ब्रिटनच्या पोलिसांनी स्वतःला भारतीय शिख म्हणवणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. याबाबत सन न्यूजपेपरने वृत्त दिलं आहे. आरोपीला शस्त्रासह शाहीघराण्याच्या वास्तव्याचं ठिकाण असलेल्या विंडसर किल्ल्याच्या परिसरातून २५ डिसेंबरला अटक केली. यावेळी ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय या याच किल्ल्यावर ख्रिसमसच्या सुट्टीसाठी आलेल्या होत्या. चेहरा झाकलेला आणि राणीच्या हत्येची धमकी देणारा व्हिडीओ आरोपीच्या स्नॅपचॅटवरून अपलोड करण्यात आल्याचंही समोर आलं आहे. व्हिडीओत नेमकं काय? सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओत चेहरा झाकलेला आहे. त्यात तो म्हणतो, "१९१९ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडात ज्या लोकांचा जीव गेला त्यांचा हा बदला आहे. याशिवाय ज्या लोकांसोबत त्यांच्या वर्णावरून भेदभाव झाला, अत्याचार झाले आणि हत्या झाल्या त्या लोकांसाठी देखील हा बदला असेल. मी एक भारतीय शिख आहे. माझं नाव जसवंत सिंग चैल होतं. आज माझं नाव डार्थ जॉन्स आहे." शस्त्रासह आरोपीला शाही किल्ला विंडसर येथून अटक दरम्यान, ब्रिटीश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ख्रिसमसच्या दिवशी पोलिसांनी विंडसर या शाही किल्ल्याच्या परिसरात घुसखोरी करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून धनुष्याप्रमाणे असलेलं क्रॉसबोव (crossbow) हे हत्यार जप्त करण्यात आला आहे. असं असलं तरी पोलिसांनी आरोपीची ओळख जाहीर केलेली नाही. हेही वाचा : जालियनवाला बाग हत्याकांडाचे रौद्ररूप आजही भारतीयांच्या मनात कायम आरोपीला ब्रिटनच्या मानसिक आरोग्य कायद्यानुसार अटक करण्यात आले आहे. त्याची मानसिक तपासणी केली जात आहे. यानंतर तो मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली असेल, असं पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात सांगितलं.