Indian Software Developer in Russia: रशियात सध्या कामगारांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे इतर देशांतून कामगार आणले जात आहेत. रशियन लष्करातही बळजबरीने आशियामधील देशांतून तरूण भरती केल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. नुकताच १७ भारतीय तरूणांचा एक गट रशियात पोहोचला. तरूणांच्या या गटाला रशियातील रस्ते स्वच्छ करण्याचे काम देण्यात आले आहे. या गटात २६ वर्षीय मुकेश मंडलही आहे. मुकेश सॉफ्टवेअर डेव्हलपर असून तो त्याने हे काम का निवडले? याबाबत माहिती दिली आहे.
रशियन वृत्तसंस्था फोंटांकाने मुकेश मंडलशी संवाद साधला. सेंट पीटर्सबर्गमध्ये स्ट्रीट क्लीनर म्हणून तो सध्या काम करतोय. कोलोम्याझस्कोये या कंपनीमार्फत मुकेश आणि त्याचे सहकारी शहरातील रस्ते स्वच्छ करण्याचे काम करतात. याच कंपनीने सर्व १७ भारतीय नागरिकांची आगमनाची आणि राहण्याची सोय केली. त्यांची देखभाल कंपनीकडून घेतली जाते. त्यांना जेवण आणि कपडेही कंपनीने दिले.
कोलोम्याझस्कोये कंपनीच्या अधिकारी मारिया तयाबिना यांनी फोंटांकाला माहिती देताना सांगितले की, भारतातून आलेला गट रस्ते साफ करणारे मजूर आहेत. भारतातून हे लोक आल्यानंतर आम्ही त्यांची कागदपत्रे तपासतो. त्यांच्या राहण्याची व्यवस्था करतो. त्यांना प्रशिक्षण देऊन तयार करतो. त्यांना सुरक्षित गणवेशही दिला जातो. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत त्यांची ने-आणही कंपनीकडून केली जाते.
फोंटांकाने दिलेल्या वृत्तात म्हटले की, या गटात १९ ते ४३ वयोगटातील भारतीय नागरिक आहेत. ज्यांची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. काही जण शेतकरी आहेत. काही स्वतःचा व्यवसाय करत होते. यात ड्रायव्हर, आर्किटेक्ट आणि विविध कौशल्य असणारे लोक आहेत. या गटात एक जण सॉफ्टवेअर डेव्हलपरही आहे.
दुसरीकडे मुकेस मंडलने सांगितले, “रशियात येण्यापूर्वी तो टेक कंपन्यांत काम करत होता. त्याने मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीत काम केले आहे. तिथे तो एआय, चॅटबॉट्स सारखे टूल्स वापरत होता.” मात्र मुकेश मंडल थेट मायक्रोसॉफ्टमध्ये किंवा त्यांच्याशी निगडित एखाद्याने एजन्सीमध्ये काम करत होता, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
मासिक वेतन १ लाख रुपये
मुकेशने पुढे म्हटले की, हे काम तो तात्पुरत्या स्वरुपात पैसे मिळवण्यासाठी करत आहे. काही पैसे कमवल्यानंतर तो पुन्हा भारतात येणार आहे. या कामासाठी कंपनीकडून भारतीय चलनात १ लाख रुपयांचे वेतन मिळते.

रशियात रस्ते स्वच्छ करण्याचे काम का निवडले असा प्रश्न विचारला असता मुकेश मंडल सांगतो की, मी भारतीय आहे. भारतात कोणते काम आहे, याला महत्त्व नाही. प्रत्येक काम देवाचे मानून केले जाते. मग तुम्ही स्वच्छतेचे काम करा किंवा कोणतेही त्याने काही फरक पडत नाही. हे माझे काम आहे आणि मी ते पूर्ण जबाबदारीने करेन.
