अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या आणि हॉटेलात काम करणाऱ्या एका तरुणाचं काळं कृत्य समोर आलं आहे. हॉटेलात कमी खर्चात राहायला देण्याकरता एका अल्पवयीन मुलीबरोबर लैंगिक संबंध ठेवल्याचं समोर आलं आहे. गुजरातचा रहिवासी असलेला कवणकुमार पटेल असं आरोपीचं नाव असून होमलँड सिक्युरिटी टास्क फोर्स आणि ओमाहा पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी १५ आणि १६ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली. तर, कवणकुमारला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अमेरिका-इन हॉटेलमध्ये घडला प्रकार

गुजरातचा रहिवासी असलेला कवणकुमार पटेल नेब्रास्का येथील ओमाहामधील एका हॉटेलमध्ये काम करत होता आणि त्याने गेल्या वर्षी जानेवारीत या मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणाचा तपास ६ जानेवारी २०२५ रोजी सुरू झाला, जेव्हा पोलिसांना चोरीची तक्रार मिळाली आणि तपासादरम्यान लैंगिक तस्करीचे पुरावे सापडले. या अल्पवयीन मुलींना व्यावसायिक लैंगिक शोषणासाठी त्यांना इतर राज्यातून ‘अमेरिका-इन’ हॉटेलमध्ये आणले गेले होते.

पीडित मुलींनी काय सांगितलं?

नेब्रास्का येथील यूएस अॅटर्नी ऑफिसने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या दोन अल्पवयीन मुलींनी सांगितले की, तस्करांनी त्यांना हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले होते, जेणेकरून हॉटेलच्या खोलीचे भाडे कमी केले जाईल. तसे न केल्यास त्यांना हॉटेलमधून हाकलून देण्याची धमकी देण्यात आली होती. हॉटेलच्या दोन कर्मचाऱ्यांनी एका अल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवण्यासाठी तस्कराला पैसे दिले, तर हॉटेलच्या तिसऱ्या कर्मचाऱ्याने दुसऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

‘अमेरिका-इन’ हॉटेलमध्ये काम करणाऱ्या पटेलने कबुली दिली की, त्याने हॉटेलमधील एका अल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवण्यासाठी हॉटेलच्या पैशांच्या ड्रॉव्हरमधून तस्करांना पैसे दिले होते. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी तस्करांना आणि त्या अल्पवयीन मुलींना अनेक दिवस हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी दिली. अॅटर्नी ऑफिसने सांगितले की, तस्कर व्यावसायिक लैंगिक शोषणासाठी ऑनलाइन जाहिराती पोस्ट करायचे आणि अल्पवयीन पीडितांचा समावेश असलेले लैंगिक व्यवहार ठरवायचे. मुलींना खूप कमी जेवण दिले जात होते. त्यामुळे तस्करांच्या सांगण्यानुसार लैंगिक संबंध ठेवण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, असे पीडित मुलींनी सांगितले.

अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या पटेलला त्याची तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर भारतात हद्दपार (Deport) केले जाईल. या प्रकरणी एडुआर्डो जोस पेर्डोमो, मिशेल मार्टिनेझ-गोन्झालेझ आणि अल्फ्रेडो झांब्रानो-हुरताडो या तस्करांवर, तसेच सुमित चौधरी आणि विशाल गोस्वामी या इतर दोन भारतीय वंशाच्या हॉटेल कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. युनायटेड स्टेट्सच्या अॅटर्नी लेस्ली वूड्स म्हणाल्या, “होमलँड सिक्युरिटी टास्क फोर्सने या मुलांची एका भयानक जिवंत नरकातून सुटका केली आहे.”