कॅनडाच्या ओंटारियो प्रांतात १२ सप्टेंबर रोजी गोळीबाराचा धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. तर इतर तिघे गंभीर जखमी झाले होते, यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचाही समावेश होता. शनिवारी (१७ सप्टेंबर) जखमी भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सतविंदर सिंग असं मृत पावलेल्या २८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर हॅमिल्टन जनरल रुग्णालयात उपचार सुरू होते, अखेर पाच दिवसांनी सतविंदरची मृत्युशी झुंज संपली. शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली आहे. हॅल्टन पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना हॅल्टन प्रादेशिक पोलीस प्रमुख स्टीफन टॅनर यांनी ‘सीबीसी’ वृत्तवाहिनीला सांगितलं की, ही आमच्या समुदायासाठी हृदयद्रावक बातमी आहे. सोमवारी घडलेल्या वेदनादायी घटनेतून आम्हाला अद्याप सावरता आलं नाही.

मृत भारतीय विद्यार्थी सतविंदर सिंग हा कॅनडातील मिल्टन येथील ‘ऑटो बॉडी शॉप’मध्ये अर्धवेळ काम करत होता. घटनेच्या दिवशी सतविंदर दुकानात काम करत होता. यावेळी झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर सिंगसह इतर तीन जण जखमी झाले. गोळीबारात घटनास्थळी मृत्युमुखी पडलेली व्यक्ती दुकानाचा मालक होता. शकील अश्रफ असं त्याचं नाव आहे.

हेही वाचा- रशियन सैनिकांनी केलं भारतीय विद्यार्थिनींचं अपहरण; एका विद्यार्थिनीनं सांगितला भयानक अनुभव

४० वर्षीय आरोपी शेअन पेट्री याने हा गोळीबार केला होता. गोळीबारानंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र, सोमवारी टोरोंटो पोलिसांनी आरोपी पेट्रीला गोळी घालून ठार केलं आहे. पेट्रीने १२ सप्टेंबर रोजी ‘एमके ऑटो रिपेअर्स’ शॉपमध्ये जाऊन दुकानाचे मालक अश्रफ यांची गोळी घालून हत्या केली. यावेळी त्याने भारतीय विद्यार्थी सतविंदर सिंगवरही गोळीबार करत त्याला जखमी केले. आरोपी पेट्री याने काही काळासाठी मृत अश्रफ यांच्या गॅरेजमध्ये काम केलं होतं. गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. स्थानिक पोलीस घटनेचा तपास करत आहेत.