Indian Student Found Dead : कॅलिफोर्नियात शिक्षणासाठी गेलेल्या २२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. साकेत श्रीनिवासय्या असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. सहा दिवसांपूर्वी तो बेपत्ता झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. आता त्याचा मृतदेह आढळून आला आहे. साकेत श्रीनिवासय्या हा विद्यार्थी मूळचा कर्नाटकचा आहे. कॅलिफोर्नियातील बेकर्ले विद्यापीठातून तो केमिकल आणि बायोम्युलॅक्युअरचं शिक्षण घेत होता. ९ फेब्रुवारीला हा विद्यार्थी कॅलिफोर्नियातून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली. आता भारतीय दुतावासाने ही माहिती दिली आहे की या विद्यार्थ्याचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. भारतीय दुतावासाने या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. साकेतचा मृतदेह भारतात पाठवण्याची प्रक्रिया सुरु केल्याचंही त्यांनी सांगितलं.

साकेत श्रीनिवासय्या सहा दिवसांपासून बेपत्ता

साकेत श्रीनिवासय्या हा विद्यार्थी मागील सहा दिवसांपासून बेपत्ता झाला होता. कॅलिफोर्नियातील भारतीय दुतावासाने साकेतचा मृतदेह पोलिसांना मिळाला असल्याची माहिती दिली आहे. साकेत श्रीनिवासय्याचा मृतदेह सापडला. त्याच्या मृत्यूची बातमी खेदजनक आहे आम्ही त्याच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. या कठीण काळात त्यांनी धीर मिळो अशा आमच्या भावना आहेत असं म्हणत भारतीय दुतावासाने साकेतच्या मृत्यूची माहिती दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

साकेत श्रीनिवासय्या आयआयटी मद्रासचा विद्यार्थी

साकेत श्रीनिवासय्या आयआयटी मद्रासचा विद्यार्थी होता. त्याने पदव्युत्तर शिक्षणासाठी कॅलिफोर्नियातील बर्कले येथे असलेल्या विद्यापीठात प्रवेश घेतला होता. बंगळुरुच्या श्री वाणी एज्युकेशन सेंटरमधूनही त्याने शिक्षण घेतलं आहे. साकेतकडे हायरपलूप, मायक्रोचॅनल कूलिंग सिस्टम विकास या गोष्टींचं पेटंट होतं. ९ फेब्रुवारीला साकेत बेपत्ता झाला. बर्कले हिल्स नावाच्या भागात अंजा लेक नावाचा एक तलाव आहे त्या ठिकाणी साकेत होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्याचा शोध घेऊ लागले होते. मात्र आता या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला आहे.

९ फेब्रुवारीला साकेतने वडिलांना केल होता फोन

कर्नाटक सरकारने साकेत श्रीनिवासय्या बेपत्ता झाल्याचं वृत्त येताच केंद्राने या प्रकरणी लक्ष घालावं अशी मागणी पत्र लिहून केली होती. साकेतच्या वडिलांनी ही मागणी केली होती की त्याच्यासोबत राहणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी केली जावी. त्यांच्याकडे साकेतबाबत विचारणा करण्यात यावी. या मागणीचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला होता. दरम्यान आता साकेतचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साकेत आणि त्याच्या वडिलांचा फोन ९ फेब्रुवारीला झाला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची बातमीच आली. त्याच्या मित्रांकडे विचारणा केली असता तो बेपत्ता झाला आहे असं त्यांनी सांगितलं. मी अमेरिकेला जाण्याचा विचार करतो आहे असंही त्याचे वडील म्हणाले होते. या सगळ्यानंतर आता सहा दिवसांनी साकेतचा मृतदेह आढळून आला आहे.