Indian Student Handcuffing Row : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या निर्णयांची जगभरात चर्चा सुरु आहे. बेकायदेशीर स्थलांतरिताच्या मुद्द्याची देखील प्रामुख्याने मोठी चर्चा झाल्याचंही पाहायला मिळालं. असं असतानाच अमेरिकेत एका भारतीय विद्यार्थ्यांला नेवार्क विमानतळावर अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

अमेरिकेतून हद्दपार करण्याच्याआधी त्या विद्यार्थ्याला विमानतळावरील अधिकाऱ्यांनी मारहाण करत बेड्या घालत जमिनीवर ढकलल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. अमेरिकेतील नेवार्क विमानतळावरून भारतीय विद्यार्थ्याला हातकड्या घालून परत पाठवण्यात आल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या घटनेनंतर भारतातील अमेरिकन दूतावासाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

भारतातील अमेरिकन दूतावासाने म्हटलं आहे की, ‘अमेरिका कायदेशीर पर्यटकांचं स्वागत करेल. मात्र, बेकायदेशीर प्रवेश, व्हिसाचा गैरवापर किंवा अमेरिकन कायद्याचं उल्लंघन सहन करणार नाही. कायद्याचं उल्लंघन करत अमेरिकेत प्रवास करण्याचा कोणताही अधिकार नाही’, असं दूतावासाने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत अमेरिकेतील भारतीय दूतावास अमेरिकन अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन विमानतळावर आणि भारतातील अमेरिकन दूतावासात भारतीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. संपूर्ण घटनेची माहिती भारताला अद्याप मिळालेली नाही. त्या भारतीय विद्यार्थ्यांला कोणत्या आधारावर ताब्यात घेण्यात आलं? भारतीय तरुणाचे अंतिम ठिकाण कोणतं होतं? याबाबत परराष्ट्र मंत्रालय लक्ष ठेवून आहे.

व्हिडीओत नेमकं काय आहे?

नेवार्क विमानतळ अमेरिकन अधिकाऱ्यांनी एका भारतीय विद्यार्थ्याला हातकडी लावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ संबंधित विद्यार्थी रडत होता. मात्र, तरीही त्याला गुन्हेगार असल्यासारखं वागवलं गेलं. त्या विद्यार्थ्याला अमेरिकेतून भारतात परत पाठवलं जात असल्याचं म्हटलं.

दरम्यान, या घटनेबाबत भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटलं की, “आम्हाला सोशल मीडियावर अशा पोस्ट आढळल्या आहेत. ज्यात दावा केला जात आहे की एका भारतीय तरुणाला नेवार्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडचणी निर्माण झाली आहे. आम्ही या संदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत”, असं भारतीय एका अधिकाऱ्याने एक्सवर म्हटलं आहे.