Indian Student Prasanna Ataluri Died: अमेरिकेत झालेल्या अपघातात २५ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये हा अपघात झाला. प्रसन्ना अटलुरी असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ती मूळची आंध्र प्रदेशातील रहिवासी होती. प्रसन्नाने पेस युनिव्हर्सिटीच्या लुबिन स्कूल ऑफ बिझनेसमधून पदवी घेतली होती. प्रसन्ना तिच्या मैत्रिणींसोबत मंदिरात जात असताना हा अपघात झाला.

आणखी एका महिलेचा मृत्यू

न्यूयॉर्कमध्ये मंदिराच्या दिशेने जात असताना अटलुरीच्या वाहनाला मागून दुसऱ्या गाडीने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. गाडी सिग्नलवर थांबलेली असताना, मागून भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला. अटलुरीसह प्रवास करणाऱ्या आणखी एका महिलेचा देखील यात मृत्यू झाला आहे. तर, आणखी एकजण यात गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेतकरी कुटुंबात जन्म

मृत अटलुरी मूलापाडू गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील होती. प्रसन्ना अटलुरीचे वडील वसंतराव हे शेतकरी असल्याचे सांगितले जाते, तर तिची आई पिशव्या बनवण्याचे काम करते. प्रसन्नाने नुकतेच अमेरिकेतील आपले शिक्षण पूर्ण केले होते आणि ती कामाच्या शोधात होती, असे वृत्त तिच्या कुटुंबीयांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने प्रसिद्ध केले आहे.

आर्थिक मदतीचे आवाहन

प्रसन्नाच्या निधनानंतर तिचा चुलत भाऊ रवी कुमार यांनी, तिचे पार्थिव भारतात परत आणण्यासाठी कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले असून, निधी संकलन मोहीम सुरू केली आहे. “प्रसन्ना कुटुंबाचा भावनिक आणि आर्थिक आधारस्तंभ होती. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, निधी संकलनाच्या या मोहिमेला पाठिंबा मिळत असून, आतापर्यंत ४०,००० डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. अटलुरी कुटुंबियांनी प्रशासनाकडूनही तिचा मृतदेह भारतात आणण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.