scorecardresearch

रशियाविरुद्ध लढण्यासाठी भारतीय तरुण युक्रेनच्या सैन्यात सामील; युक्रेनियन माध्यमांचा दावा

युक्रेनच्या सैन्याला भारतीयांसह इतर अनेक देशांतील लोकांचा पाठिंबा मिळत आहे.

Indian student reached Ukraine to fight against Russia claims Ukrainian media
(फोटो सौजन्य – @KyivIndependent)

युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात युक्रेनच्या सैनिकांसोबतच सामान्य युक्रेनियन नागरिकही लढाईत उतरल्याचे समोर येत आहेत. आता युक्रेनच्या सैन्याला भारतीयांसह इतर अनेक देशांतील लोकांचा पाठिंबा मिळत आहे. किव्ह इंडिपेंडंटने युक्रेनच्या लष्कराच्या हवाल्याने म्हटले आहे की रशियाच्या विरोधात अमेरिका, ब्रिटन, स्वीडन, लिथुआनिया, मेक्सिको आणि भारतातील लोक लढत आहेत.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील २१ वर्षीय विद्यार्थी, सैनिकेश रविचंद्रन हा रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनियन निमलष्करी दलात सामील झाला आहे. वृत्तानुसार, अधिकार्‍यांनी त्याच्या घरी जाऊन रविचंद्रनच्या पालकांशी संवाद साधला आणि असे कळले की त्याने भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला होता पण तो नाकारण्यात आला होता.

रविचंद्रन २०१८ मध्ये अभ्यासासाठी युक्रेनच्या खार्किव शहरात गेला होता. त्याचा अभ्यासक्रम २०२२ मध्ये पूर्ण होणार होता. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रविचंद्रन यांच्या कुटुंबाचा संपर्क तुटला होता. दूतावासाची मदत घेतल्यानंतर कुटुंबीयांनी रविचंद्रन यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान, रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनच्या निमलष्करी दलात सामील झाल्याचे रविचंद्रनने कुटुंबीयांना सांगितले आहे.

युक्रेनने परदेशी लोकांसाठी ‘आंतरराष्ट्रीय सैन्य’ स्थापन केले आहे आणि राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी जाहीरपणे परदेशी लोकांना रशियाच्या गुन्हेगारांविरुद्ध युक्रेनियन लोकांच्या खांद्याला खांदा लावून लढा असे आवाहन केले. गेल्या आठवड्यात, झेलेन्स्की यांनी १६,००० हून अधिक परदेशी स्वेच्छेने आमच्या लढ्यात सामील झाले आहेत असे म्हटले होते.

राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी १ मार्च रोजी देशाच्या आंतरराष्ट्रीय सैन्य दलात सामील होऊ इच्छिणाऱ्या रशियन वगळता परदेशी लोकांना तात्पुरता व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी देणार्‍या हुकुमावर स्वाक्षरी केली होती. स्वारस्य असलेल्या परदेशी नागरिकांना त्यांच्या देशांतील युक्रेनच्या दूतावासाशी संपर्क साधणे आवश्यक आहे, कागदपत्रे सादर करणे आणि त्यांनी लढ्यात सामील होण्यापूर्वी मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २१ फेब्रुवारी २०२२ रोजी डोनेस्तक आणि लुहान्स्क या फुटीरतावादी प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य केल्यानंतर युक्रेनमधील संघर्ष सुरू झाला आहे. २४ फेब्रुवारी रोजी पुतिन यांनी लष्करी कारवाई सुरू केली आणि युक्रेनवर आक्रमण केले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian student reached ukraine to fight against russia claims ukrainian media abn

ताज्या बातम्या