आपल्या कुटुंबाचे भविष्य उजळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून अमेरिकेत गेलेल्या २६ वर्षीय भारतीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या इरागानाबोयिना चंदू याने शिकागोमध्ये बेरोजगारीच्या तणावातून आत्महत्या केली. मुलाच्या निधनामुळे त्याचे सुरक्षा रक्षक असलेले वडील आणि संपूर्ण कुटुंब कोलमडून पडले असून, त्याचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी आता सरकार आणि परदेशातील भारतीय समुदाय मदतीसाठी पुढे सरसावला आहे.
स्वप्नांचा आणि संघर्षाचा अंत
चंदूने शिकागो येथील ‘डीपॉल युनिव्हर्सिटी’मधून नुकतीच पदव्युत्तर पदवी पूर्ण केली होती. पदवी मिळाल्यानंतर तो गेल्या अनेक आठवड्यांपासून अमेरिकेत नोकरी शोधत होता, मात्र यश मिळत नव्हते. दुसरीकडे, भारतात त्याचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी मोठे कर्ज घेतले होते.
नोकरी मिळत नसल्यामुळे चंदूला नैराश्याने ग्रासले होते. आपण अजूनही कुटुंबावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहोत आणि वडिलांचे कष्ट कमी करू शकत नाही, ही सल त्याला अस्वस्थ करत होती. याच मानसिक तणावातून त्याने राहत्या घरी आपले जीवन संपवले.
पार्थिव मायदेशी आणण्यासाठी आर्थिक मदतीचा ओघ
चंदूचे पार्थिव अमेरिकेतून भारतात आणण्यासाठीचा खर्च अंदाजे २५,००० डॉलर्स (सुमारे २१ लाख रुपये) इतका आहे. त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहता हा खर्च पेलणे त्यांना अशक्य होते. त्यामुळे अमेरिकेतील भारतीय समुदायाने चंदूच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी १,२०,००० डॉलर्स उभे करण्याचे ध्येय ठेवून एक ‘फंडरेझर’ मोहीम सुरू केली.
या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून, अवघ्या दोन दिवसांत ७६,००० डॉलर्सहून अधिक निधी जमा झाला आहे. २५,००० डॉलर्सचा वापर पार्थिव भारतात पाठवण्यासाठी केला जाईल, तर उरलेली रक्कम चंदूच्या पालकांना त्यांचे कर्ज फेडण्यासाठी दिली जाणार आहे.
सरकारकडून मदतीचे आश्वासन
या घटनेची दखल घेत आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश यांनी शोक व्यक्त केला असून त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. चंदूचे पार्थिव कोणत्याही अडचणीविना भारतात आणण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे आश्वासन मंत्री नायडू यांनी दिले आहे.
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी मानसिक तणावात असेल किंवा नैराश्याचा सामना करत असेल, तर कृपया मदतीसाठी पुढे या. मदतीसाठी तज्ज्ञ समुपदेशक किंवा स्थानिक हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधा. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही.
