Indian Student murder girlfriend: अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यात १९ वर्षीय प्रेयसीची हत्या केल्याच्या आरोपाखाली भारतीय विद्यार्थ्याला जर्मनीत अटक करण्यात आली आहे. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, आरोपी वरुण बच्चिगिरी जर्मनीहून भारतासाठी विमान पकडण्याच्या तयारीत होता. तेव्हाच त्याला अटक करण्यात आली. २० वर्षांच्या वरुणवर १९ वर्षांची प्रेयसी जुलिसा रुबी सालाझारची हत्या केल्याचा आरोप आहे. वरुण ॲरिझोना विद्यापीठात बिझनेस ॲनालिटिक्सचा अभ्यास करत होता. त्याने ६ ऑगस्ट रोजी जुलिसाची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

अमेरिकेतील टक्सन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसीची हत्या केल्यानंतर वरुण टक्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जर्मनीला पोहोचला. तिथून तो भारतात येण्याच्या प्रयत्नात असताना विमानतळ अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. त्याच्यावर फर्स्ट डिग्री हत्या आणि अपहरणाचा खटला चालविण्यात येणार आहे.

तपासकर्त्यांनी केलेल्या तपासातून असे दिसून आले की, जुलिसाची गळा आवळून हत्या केल्यानंतर वरुणने तिचा मोबाइल आणि क्रेडिट कार्ड चोरले. तिच्या मोबाइलवरून तो तिच्या पालकांना मेसेजेस पाठवत होता. जेणेकरून जुलिसा त्यांच्याशी संवाद साधतेय, हे भासविण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र मेसेजेसच्या भाषेवरून कुटुंबीयांना शंका आली. त्यांनी पोलिसांना फोन करून जुलिसाच्या अपार्टमेंटमध्ये तिचा शोध घेण्याची विनंती केली. पोलीस जुलिसाच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचले असता तिथे तिचा मृतदेह आढळून आला.

प्रेयसी नाते संपवू इच्छित होती

KOLD वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, लैंगिक अत्याचार आणि गैरवर्तन केल्यामुळे जुलिसाला वरुणशी असलेले नाते संपवायचे होते. जुलिसाच्या मित्रांनी सांगितले की, हत्या होण्यापूर्वी तिच्या खोलीतून मोठमोठ्या किंचाळण्याचे आवाज येत होते. मित्रांनी याबद्दल जुलिसाची चौकशी केली असता तिने सर्व काही ठिक असल्याचे कळवले होते. तिच्यात आणि वरुणमध्ये किरकोळ भांडण झाल्याचे तिने सांगितले.

तपासकर्त्यांनी वरुण बच्चिगिरीच्या वादग्रस्त इतिहासाकडेही लक्ष वळवले आहे. द न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या बातमीनुसार, पिमा काउंटी कोर्टात त्याच्याविरोधात जबरी हल्ला केल्याप्रकरणी फौजदारी प्रकरण सुरू आहे. एक महिलेने दिलेल्या माहितीनुसार, वरुण बच्चिगिरीने हॅलोविनच्या दिवशी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. मात्र तिने त्यावेळी त्याची तक्रार केली नव्हती.

विद्यापीठातूनही काढून टाकले होते

दरम्यान ॲरिझोना विद्यापीठातूनही त्याला काढून टाकण्यात आले होते. त्याच्यावर हिंसाचाराचे आरोप ठेवले गेले होते. त्यामुळे त्याला अर्ध्यातूनच विद्यापीठातून काढून टाकले गेले होते. जुलिसाचा खून करण्यापूर्वी वरुणच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या, त्याचा आता या गुन्ह्याशी संबंध जोडला जात आहे. काही आठवड्यांपूर्वीच त्याला नोकरीही गमवावी लागली होती. ज्यामुळे त्याच्या इमिग्रेशनवर संकट आले होते.