जर्मनीतला चेम्निट्झचा राजा

जर्मनीतील भारतीय विद्यार्थ्यांनी इंडियन cultural सेन्टर (ICC Chemnitz ) च्या अंतर्गत गणपतीची प्रतिष्ठापना केली

– अक्षय लोटणकर                                                                                                                                                                                                   शिक्षण , नोकरी, व्यवसाया निमित्त परदेशी गेलेल्या लोकांना हुरहूर लागते ती सणांची. आपले सण, ते साजरा करण्याचा पद्धती, त्यातील खाद्यपदार्थ, या सर्व गोष्टींची आठवण प्रकर्षाने जाणवत राहते. त्यातला एक सण म्हणजेच गणेशोत्सव. महाराष्ट्रातच किंवा संपूर्ण भारतात नव्हे इतर देशातही लोकप्रिय झालेला गणपती हे सर्वांचे लाडके दैवत. दीड ते दहा दिवस या कालावधीत आपल्या घरात विराजमान होऊन, पुढचा वर्षी लवकर या असं म्हणून निरोप घेणारा गणपती हे एकीकरणचे माध्यमच आहे.

जर्मनीतील चेम्निट्झ या शहरात शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी इंडियन cultural सेन्टर (ICC Chemnitz ) च्या अंतर्गत गणपतीची प्रतिष्ठापना केली. हे त्यांचं दुसरं वर्ष आहे. त्यासाठी लागणारी मूर्ती गेल्या वर्षी भारतातून मागवली गेली. युनिव्हर्सिटी मधील एक हॉल घेऊन, त्यात सुबक अशी सजावट करून ३ दिवस गणपती मांडला जातो. शक्यतो हे ३ दिवस वीकएंडचे असतात कारण त्या वेळेस सर्व विद्यार्थी उपस्थित राहू शकतात. मराठी, गुजराती, पंजाबी, साऊथ इंडियन असे सर्व एकत्र येऊन ३ दिवसांचा हा सोहळा मजेत साजरा करतात.

 

या दिवसात दोन्ही वेळची आरती, ठरलेल्या वेळेत नियमितपणे केली जाते. तसेच सकाळ संध्याकाळ वेगवेगळे नैवैद्यही दाखवले जातात. शिरा, मोदक, शंकरपाळे, लाडू, आम्रखंड, खीर, बासुंदी, पायसम, ढोकळा, गुलाबजाम, रसमलाई अशा विविध प्रकारांची मेजवानीच असते. विद्यार्थी हे सर्व नैवैद्य आवडीने स्वतः बनवून आणतात. त्याचबरोबर हॉलमध्ये जमलेली मंडळी एकत्र बसून गप्पा मारणे, खेळणे, गाणी ऐकणे, एकत्र जेवणे, फोटो व सेल्फी काढणे हे सर्व आनंदाने करतात.

ऑगस्ट – सप्टेंबर हा काळ सुट्ट्यांचा असतो. कॉलेज नसले तरीही विद्यार्थी प्रोजेक्ट, इंटर्नशिप, थिसीस, पार्ट टाईम नोकरीच्या निमित्ताने व्यस्त असतात. काहीजण दुसऱ्या शहरांमध्ये इंटर्नशिप किंवा प्रोजेक्ट करत असतात. या निमित्ताने सर्वजण ठरवून एकत्र येतात. भारतीयच नव्हे तर परदेशी विद्यार्थीदेखील गणपतीचे दर्शन घ्यायला आपल्या भारतीय मित्रांसोबत येतात. त्यांना हा सण व त्यामागची कथा ऐकायला आवडते. व्हीडियो कॉलवर आपल्या घरचांना परदेशातला गणपती दाखवण्यात आणि हे सर्व आपण केलंय हे सांगण्यात एक वेगळीच गम्मत अनुभवायला मिळते. अनोळखी प्रदेशातील चांगले व वाईट अनुभव, आयुष्यातली पुढची वाटचाल आणि घरचांची आठवण यात असे सण साजरा करणे म्हणजे एक पर्वणीच आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian students celebrate ganeshotsav in germany