वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियातून तेल खरेदी करणाऱ्या देशांच्या आयातीवर ५०० टक्के शुल्क लावण्याचा इशारा दिल्याने भारतीय वस्त्र आणि कापड उद्योगात चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. हे शुल्क लागू झाल्यास तमिळनाडूला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अमेरिका-भारत व्यापार करार अद्याप झालेला नाही. ‘सध्याची परिस्थिती कायम राहिली, तर अंदाजे ३० लाख नोकऱ्यांवर तातडीने गंडांतर येईल’, असा इशाराच तमिळनाडूचे अर्थमंत्री थंगम तेन्नरसू यांनी शनिवारी केंद्रीय अर्थमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिला.
सध्या भारताकडून अमेरिकेत जवळपास ३० टक्के वस्त्र निर्यात होते. आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान भारताने ३७ अब्ज डॉलर किमतीचे वस्त्र आणि कपडे अमेरिकेत निर्यात केले. तामिळनाडूमधील तिरुपूरमध्ये देशातील सर्वांत मोठे विणकाम क्षेत्र असून, भारतातील सुमारे ९० टक्के विणकाम निर्यात येथूनच होते. शिवाय तामिळनाडूतून ३१ टक्के वस्तूंची निर्यात अमेरिकेतील बाजारपेठेत होते. त्यामुळे वाढीव शुल्काचा इतर राज्यांपेक्षा तमिळनाडूवर अधिक गंभीर परिणाम होईल,’ असा इशारा अर्थमंत्री थंगम तेन्नरसू यांनी दिला.गेल्या वर्षी ऑगस्टपासून लागू असलेल्या ५० टक्के अमेरिकन शुल्कामुळे भारतीय निर्यातदारांना आधीच वस्तूंच्या किमतीत कपात करावी लागली, पर्यायी बाजारपेठा शोधाव्या लागल्या तसेच शेजारील देशांद्वारे माल पाठवावा लागला. शिवाय वाढीव शुल्कामुळे अमेरिकेत भारतीय वस्तूंच्या किंमती वाढल्याने ग्राहकांनी त्यांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
वस्त्रोद्योग क्षेत्रावर ताण
– देशातील विविध राज्यांबरोबरील अर्थसंकल्पपूर्व सल्लागार बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. बैठकीत तमिळनाडूच्या अर्थमंत्र्यांनी राज्यातील उत्पादन आणि रोजगाराच्या जोखमीकडे लक्ष वेधले. विशेषतः वस्त्रोद्योग क्षेत्रावर ताण आल्याचे त्यांनी सांगितले.
– ‘तामिळनाडूमधून भारताच्या २८ टक्के वस्त्रोद्योगाची निर्यात होते आणि ७५ लाखांहून अधिक कामगारांना रोजगार मिळतो, त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास ३० लाख नोकऱ्या जातील, अनेक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) बंद पडतील,’ असा इशारा तेन्नरसू यांनी दिला.
खरेदीदारांच्या मानसिकतेत तीव्र बदल
अमेरिकेत हिवाळी हंगाम सुरू होणार असल्याने भारतीय वस्त्र उत्पादक तयारीत आहेत, परंतु ५०० टक्के शुल्काच्या इशाऱ्यामुळे निर्यातीची शक्यता आणि कारखान्यांच्या उत्पादनक्षमतेवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. गेल्या ऑगस्टमध्ये अमेरिकेने लादलेल्या ५० टक्के शुल्कातून हा उद्योग सावरलेला नाही, त्यात गेल्या काही आठवड्यांत अमेरिकेतील खरेदीदारांच्या मानसिकतेतही तीव्र बदल झाल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे.
परिणाम कसा?
भारताच्या वस्त्रोद्योगातील आणि तयार कपड्यांचा मोठा भाग अमेरिकेत निर्यात केला जातो. जर या उत्पादनांवर अधिक कर लादले गेले, तर भारतीय उत्पादने महाग होतील. यामुळे अमेरिकन खरेदीदार इतर देशांकडे वळू शकतात. याचा थेट परिणाम कारखाने आणि येथील लाखो कामगारांवर होईल.
