Amid rising tensions in West Asia, Indian vessel Green Saanvi successfully navigates the critical Strait of Hormuz corridor : पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष पेटलेला आहे. यादरम्यान भारतीय ध्वज असलेल्या ग्रीन सान्वी (Green Saanvi) या एलपीजी टँकरने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे. शीप ट्रॅकिंग डेटानुसार, पर्शियन आखातात अडकून पडलेल्या या जहाजाने शुक्रवारी संध्याकाळी इराणच्या सागरी हद्दीतील कॉरिडॉर वापरून होर्मुझची सामुद्रधुनी पार केली आहे.

या टँकरमध्ये सुमारे ४४ हजार टन एलपीजी आहे. पश्चिम आशियात युद्ध सुरू होण्यापूर्वी भारताला अर्ध्या दिवसासाठी जेवढा गॅस लागायचा, तेवढा साठा या एकाच जहाजात आहे. सध्या युद्धामुळे एलपीजीचा पुरवठा कमी झाला असल्याने, भारताचा एलपीजी वापरही घटला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रीन आशा (Green Asha) आणि जग विक्रम (Jag Vikram) हे दोन भारतीय एलपीजी टँकर देखील येत्या काही दिवसांत ही सामुद्रधुनी ओलांडून भारताकडे रवाना होण्याची शक्यता आहे.

पश्चिम आशियामधील संघर्ष सुरू झाल्यापासून ही सामुद्रधुनी ओलांडणारे ग्रीन सान्वी हे भारतीय ध्वज असलेले सातवे व्यापारी जहाज आहे. ही सातही जहाजे एलपीजी टँकर होती. ग्रीन सान्वीने सामुद्रधुनी ओलांडल्याने आता होर्मुझ सामुद्रधुनीच्या पूर्वेला असलेल्या पर्शियन आखातात भारतीय ध्वज असलेली १७ जहाजे आहेत. ज्यामध्ये अजून तीन एलपीजी टँकर, चार क्रूड ऑइल टँकर, एक एलएनजी टँकर, एक केमिकल प्रॉडक्ट टँकर, तीन कंटेनर जहाजे, दोन ब्लक कॅरिअर्स आणि नियमित देखभाल केली जात असलेली दोन जहाजे आहेत.

पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरल्यानंतर, भारताकडून राजनैतिक पातळीवर भारतीय जहाजांसाठी सुरक्षित मार्ग मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

गेल्या आठवड्यात इराणने स्पष्ट केले होते की, अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या मित्रराष्ट्र सोडून इतर देशांशी संबंधित असलेली जहाजे इराणच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून ही सामुद्रधुनी ओलांडू शकतात.

तसेच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले होते की, इराणच्या संपर्कात असलेले आणि मित्र मानल्या जाणाऱ्या देशांसाठी सामुद्रधुनी खुली असेल.तसेच ते पुढे म्हणाले की, चीन, रशिया, भारत, इराक आणि पाकिस्तान या देशांच्या जहाजांना या सागरी मार्गाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने यासंबंधीचे वृत्त दिले होते.