‘दक्षिण आफ्रिकेमधील शतकातील सर्वोत्तम विवाह’ म्हणून ज्या विवाहसोहळ्याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. त्या गुप्ता कुटुंबीयांकडील विवाह वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विवाहासाठी आफ्रिकेमध्ये आलेल्या ‘वऱ्हाडय़ां’चे हेलिकॉप्टर कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय लष्करी धावपट्टीवर उतरल्यामुळे राजकीय विश्वात खळबळ माजली आहे. आफ्रिकेचे अध्यक्ष झुमा यांनी या शाही विवाहसोहळ्यास हजेरी न लावण्याचा निर्णय घेतला आहे, तर एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
‘द न्यू एज’ हे दैनिक आणि सहारा कॉम्प्युटर्स या दोन कंपन्यांचे मालक गुप्ता यांची मुलगी वेगा गुप्ता (२३) भारतीय वंशाच्या आकाश जहाजघरीया या मुलासह १ ते ४ मे २०१३ या कालावधीत सन सिटी येथे शाही सोहळ्याद्वारे विवाहबद्ध होणार होते. या शाही सोहळ्यास आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह नामांकित असामींची उपस्थिती लाभणार होती. तसेच यासाठी बॉलीवूडमधील कलाकार आणि गायक मंडळीही उपस्थित राहणार होती.
या सोहळ्यासाठी सुमारे २०० जणांना घेऊन आलेले गुप्ता कुटुंबीयांचे चार्टर्ड विमान प्रिटोरिया येथील हवाई दलाच्या वॉटरक्लूफ धावपट्टीवर उतरले. मात्र तेथील परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते क्लेसन मनिला यांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी आयोजकांतर्फे पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. अगदी संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय किंवा अध्यक्षीय विभाग यांपैकी कोणीही ही परवानगी दिली नसल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून विमान उतरविण्यासाठी आवश्यक तो ‘क्लीअरन्स’ कसा देण्यात आला, यामागे कोणकोणत्या शासकीय अधिकाऱ्यांचा हात आहे, याची चौकशी सुरू असल्याचे प्रवक्त्यांतर्फे स्पष्ट करण्यात आले. मात्र या प्रकरणी परराष्ट्र व्यवहार खात्यातील एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यावर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे, तर भारतीय दूतावासातर्फे विमान उतरविण्यासाठी आफ्रिका सरकारची परवानगी मिळवण्यात आली होती, असा दावा गुप्ता कुटुंबीयांनी केला आहे.