Indian woman moves to Mumbai US work culture debate : अमेरिकेतून नुकतेच मुंबईत स्थलांतरित झालेल्या एका भारतीय महिलेने अमेरिकेतील जवळपास दशकभराच्या नोकरीचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘ओव्हरवर्क’ म्हणजेच अतिरिक्त कामाचा ताण हा केवळ एखाद्या एका देशापुरता मर्यादित नसतो, असं तिने म्हटलं आहे.

परिनया यांनी अमेरिकेत जवळपास नऊ वर्षे कन्सल्टंट म्हणून काम केलं. अमेरिकेतील कामाची संस्कृती म्हणजे संध्याकाळी ५ वाजता काम बंद करून घरी जाणे, हा समज आपल्या अनुभवाशी अजिबात जुळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या, “अमेरिकेत संध्याकाळी ५ वाजता काम संपतं, हा गैरसमज आता दूर व्हायला हवा.”

“अमेरिकेतील कामाची संस्कृती म्हणजे ५ वाजता काम बंद करणं, असं लोकांना वाटतं. मात्र, मी जवळपास नऊ वर्षे कन्सल्टंट म्हणून काम केलं आणि माझ्यासाठी अशी गोष्ट कधीच अस्तित्वात नव्हती”, असं त्यांनी सांगितलं. आपल्या कामाच्या अनुभवाबद्दल सांगताना परिनया म्हणाल्या की, त्यांना अनेकदा संध्याकाळी उशिरा मॅनेजरकडून मेसेज येत असत. “खरं सांगायचं तर, संध्याकाळी ७ वाजता माझ्या मॅनेजरचा मेसेज यायचा आणि ‘मी पाठवलेल्या ई-मेलला अजून उत्तर का दिलं नाही?’ असा प्रश्न विचारला जायचा. हे काही क्वचित घडत नव्हतं, तर ते अगदी सामान्य होतं”, असं त्यांनी सांगितलं.

अतिरिक्त कामाचा ताण हा कोणत्याही एका देशाशी जोडून पाहता कामा नये, असंही परिनया यांनी स्पष्ट केलं. “ओव्हरवर्क ही कोणत्याही एका देशाची समस्या नाही. ती सर्वत्र आहे. नोकऱ्या वेगळ्या, कंपन्या वेगळ्या; पण सतत कामाच्या संपर्कात राहण्याचा दबाव सारखाच”, असं त्या म्हणाल्या. व्हिडिओमध्ये परिनया यांनी कामाच्या अनेक ऑनलाइन बैठकींमध्ये त्या एकमेव भारतीय किंवा वर्णाने ‘ब्राऊन’ व्यक्ती असायच्या, याचाही उल्लेख केला. त्यामुळे इतरांच्या तुलनेत आपल्याकडे अधिक बारकाईने पाहिलं जात आहे का, असा प्रश्न कधी कधी मनात यायचा, असं त्यांनी सांगितलं.

हसल कल्चर कुठेही थांबत नाही

“अनेक कॉलमध्ये मी एकमेव ब्राऊन व्यक्ती असायचे. त्यामुळे इतरांपेक्षा माझ्यावर थोडं अधिक कठोरपणे लक्ष ठेवलं जात आहे का, असा प्रश्न मला कधी कधी पडायचा. मी ते सिद्ध करू शकत नाही, पण मला तसं जाणवत होतं”, असं त्यांनी म्हटलं. मात्र, आपल्या वक्तव्याचा उद्देश एका देशातील कामाची संस्कृती दुसऱ्या देशापेक्षा वाईट असल्याचं सांगणं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. “हा मुद्दा एका देशाला दुसऱ्या देशापेक्षा वाईट ठरवण्याचा नाही. मुद्दा एवढाच आहे की ‘हसल कल्चर’ म्हणजे सतत काम करण्याची संस्कृती कोणत्याही सीमारेषेवर थांबत नाही, हे आपण प्रामाणिकपणे मान्य केले पाहिजे,” असे परिनया म्हणाल्या.

आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “कशाहीपेक्षा मानसिक शांतता महत्त्वाची. मी स्वतःचा अनुभव प्रामाणिकपणे मांडत आहे. अमेरिकेत सॉफ्टवेअर कन्सल्टंट म्हणून काम करताना आलेल्या अनुभवाच्या आधारे हे माझं वैयक्तिक मत आहे.”