Premium

“देशात हुकूमशाही सुरू झालीये का?” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल!

साक्षी मलिक म्हणते, “देशात हुकुमशाही सुरू झालीये का? या देशातलं सरकार आपल्या खेळाडूंना…!”

sakshi malik protest
दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

एकीकडे राजधानी दिल्लीत देशाच्या नव्या संसद भवनाचं मोठ्या उत्साहात आणि विधीवत उद्घाटन सोहळा पार पडत असताना दुसरीकडे जंतरमंतरवरच्या कुस्तीपटूंना पोलिसी कारवाईने हटवण्यात येत होतं. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या महिला कुस्तीपटूंसह त्यांना समर्थन देणाऱ्या इतर कुस्तीपटूंनी नव्या संसद भवनाच्या दिशेनं निषेध मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्यांना अडवून त्यांची धरपकड करण्यात आली. रात्री उशीरा आंदोलक कुस्तीपटूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आंदोलक महिला कुस्तीपटू साक्षी मलिकनं संतप्त ट्वीट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी नेमकं काय घडलं?

गेल्या काही महिन्यांपासून काही भारतीय कुस्तीपटू कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. यासाठी जवळपास तीन महिन्यांपूर्वी या कुस्तीपटूंनी ८ ते १० दिवस आंदोलन केलं होतं. त्यानंतर त्यांना कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. परंतु, कारवाई होत नसल्याचं पाहून त्यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आणि जंतर-मंतरवर आंदोलन सुरू केलं. रविवारी नव्या संसद भवनाचं उद्घाटन होत असताना कुस्तीपटूंनी निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवून त्यांची धरपकड केली. विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांना ताब्यात घेतलं. आता रात्री उशीरा आंदोलक कुस्तीपटूंवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

कोणता गुन्हा?

आंदोलक कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांनी रविवारी जंतरमंतरवर घडलेल्या गोंधळप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलं १४७, १४९, १८६, १८८, ३३२, ३५३ आणि पीडीपीपी कायद्याच्या कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने एएनआयनं दिली आहे.

साक्षी मलिकनं केला संतप्त सवाल!

दरम्यान, रात्री गुन्हा दाखल होताच आंदोलक कुस्तीपटू साक्षी मलिकनं संतप्त सवाल करणारं ट्वीट केलं आहे. “दिल्ली पोलिसांना लैंगिक शोषण करणाऱ्या बृजभूषण सिंह यांच्याविरोधात FIR दाखल करण्यासाठी सात दिवस लागतात. पण शांततेत आंदोलन करण्यासाठी आमच्याविरोधात FIR दाखल करण्यासाठी सात तासही लागले नाहीत. या देशात हुकुमशाही सुरू झाली आहे का? इथलं सरकार कशा प्रकारे आपल्या खेळाडूंशी वागतंय, हे अवघं जग बघतंय”, असं साक्षीनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, एकीकडे आंदोलक कुस्तीपटूंची धरपकड करतानाच दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरील आंदोलन स्थळावरून आंदोलकांचे तंबू आणि इतर साहित्य हटवण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 08:13 IST
Next Story
कीव्हवर मोठा ड्रोन हल्ला, एक जण मृत्युमुखी