गेल्या काही महिन्यांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी तीव्र आंदोलन केलं आहे. सात महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात राजधानी दिल्लीमध्ये महिला कुस्तीपटूंबरोबरच अनेक पुरुष कुस्तीपटू, प्रशिक्षकही सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. या कुस्तीपटूंनी देशातून आणि विदेशातूनही मोठा पाठिंबा मिळू लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि आंदोलक कुस्तीपटूंमध्ये तब्बल सहा तास झालेल्या चर्चेत तोडगा निघाल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात स्वत: अनुराग ठाकूर यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहा तास चालली बैठक

काही दिवसांपूर्वी कुस्तीपटू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये रात्री उशीरा तब्बल दोन तास बैठक झाली. यावेळी दोन्ही बाजूंकडून नेमकी काय चर्चा झाली, यासंदर्भात अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाही. मात्र, बुधवारी अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना चर्चेसाठी पुन्हा पाचारण केल्याचं सांगितल्यानंतर या घडामोडींचा उलगडा झाला. जवळपास सहा तास आंदोलक आणि अनुराग ठाकूर यांच्यात बैठक झाल्यानंतर संध्याकाळी त्यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली.

कोणत्या अटींवर सहमती?

आंदोलक कुस्तीपटू आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती झाली. अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत तपास पूर्ण करून १५ जूनपर्यंत चार्जशीट दाखल केली जावी, भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक ३० जूनपर्यंत घेतली जावी, कुस्ती महासंघाची अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली जावी, समितीच्या अध्यक्षपदी महिला असावी, निवडणूक होईपर्यंत आयओएच्या अॅड हॉक कमिटीवर दोन प्रशिक्षकांची नियुक्ती केली जावी, निवडणुका होतील तेव्हा त्यावर चांगले पदाधिकारी निवडून यावेत यासाठी खेळाडूंशी चर्चा केली जावी, माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या तीन टर्म पूर्ण झाल्या असून ते स्वत: किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्ती निवडून येऊ नये अशा कुस्तीपटूंच्या प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.

“ज्या खेळाडूंच्या, आखाड्यांच्या, प्रशिक्षकांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेतले जावेत. १५ जूनपर्यंत चार्जशीट दाखल होईपर्यंत खेळाडू आंदोलन करणार नाहीत”, अशी माहितीही अनुराग ठाकूर यांनी यावेळी दिली.

कुस्तीपटू बनण्यासाठी काय करावे लागते? National आणि State Level कुस्तीपटू म्हणून करिअर करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतात?

दरम्यान, एकीकडे सहमतीने अटी मान्य झाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं असताना कुस्तीपटूंनी त्याला दुजोरा दिला आहे. मात्र, १५ जूनपर्यंत सरकारने आपल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही, तर पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याची भूमिका कुस्तीपटूंनी घेतली आहे.

“सरकारने आम्हाला १५ जूनपर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे. आम्हीही आमच्याविरोधातील गुन्हे मागे घेतले जावेत, अशी विनंती केली, ती सरकारने मान्य केली आहे. जर १५ जूनपर्यंत यासंदर्भात कार्यवाही केली गेली नाही, तर आम्ही पुन्हा आंदोलन सुरू करू”, अशी प्रतिक्रिया कुस्तीपटू बजरंग पुनियानं दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian wrestlers protest on halt meeting with anurag thakur chargsheet before 15 june pmw
First published on: 08-06-2023 at 08:08 IST