अमेरिकेतून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलाऊन टाकणारी घटना समोर आली आहे. मूळचा तेलंगणाना असलेला २८ वर्षीय भारतीय तरुण अंशुल कुंचा याची पेनसिल्व्हेलिया राज्यातील फिलाडेल्फिया येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. वीकेंडला पार्ट-टाईम पिझ्झा डिलिव्हरीचे काम करणार्या अंशुलला एका बनावट ऑडरव्दारे सापळ्यात अडकवून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केला आहे.

एका मल्टिनॅशनल कंपनीत करत होता काम

अंशुल कुंचा हा गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. तो तिथे एका नामांकित बहुराष्ट्रीय (MNC) कंपनीत पूर्णवेळ नोकरी करत होता. मात्र, अतिरिक्त उत्पन्नासाठी तो वीकेंडला पार्ट-टाइम पिझ्झा डिलिव्हरीचे काम करायचा. शनिवारी रात्री त्याला एका ओसाड आणि निर्जन भागात पिझ्झा पोहचवण्याची ऑर्डर मिळाली. अंशुल जेव्हा त्या ठिकाणी पोहोचला, तेव्हा तिथे आधीच दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला. हल्लेखोरांनी अंशुलच्या डोक्यात एकापाठोपाठ एक अनेक गोळ्या झाडल्या आणि तिथून पळ काढला. या भीषण हल्ल्यात अंशुलचा जागीच मृत्यू झाला.

‘तो केवळ हत्येचा कट होता’ – बहिणीचा आक्रोश

या घटनेनंतर अंशुलची बहीण तन्वी हिने मीडियाशी बोलताना म्हणाली, “माझ्या भावाला एका निर्जन ठिकाणी पिझ्झा देण्यासाठी बोलावण्यात आले होते. नंतर आम्हाला समजले की ती एक बनावट/फेक ऑर्डर होती. तिथे कोणीही ग्राहक नव्हता, तो फक्त माझ्या भावाला मारण्यासाठी रचलेला एक सापळा होता. त्याची हत्या करून त्या नराधमांना काय मिळाले, हे आम्हाला माहित नाही. पण त्यांनी आमचा हसताखेळता भाऊ आमच्यापासून हिरावून घेतला.” याबाबतचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ या वृत्तसंस्थेने प्रसिध्द केले आहे.

कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, अंशुलकडून कोणतीही लूटमार झालेली नाही. त्याचे पैसे किंवा मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या नसल्यामुळे या हत्येचा मुख्य उद्देश काय होता, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनास्थळाजवळ पाठीवर बॅग घेतलेले दोन मुखवटाधारी संशयित पाहिले गेल्याचेही बोलले जात आहे.

पालकांना महत्त्वाची विनंती

अंशुलच्या बहिणीने भावूक होऊन इतर भारतीय पालकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. ती म्हणाली, “ज्या पालकांना आपल्या मुलांना अमेरिकेत पाठवायचे आहे, त्यांना माझा एकच संदेश आहे, कृपया तुमच्या मुलांना अमेरिकेत पाठवू नका. माझ्या भावाला तिथे जाण्याची इच्छा नव्हती, तरीही आम्ही त्याला पाठवले आणि आज त्याचा असा अंत झाला.”

मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू

न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने (Consulate General of India) या घटनेची दखल घेतली असून अंशुलच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. अंशुलचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला जात आहे. या घटनेमुळे तेलंगणातील गुंडलापोचमपल्ली या त्याच्या मूळ गावासह अमेरिकेतील तेलुगू समुदायावर शोककळा पसरली आहे.