दुबईमध्ये नोकरीसाठी गेलेल्या एका भारतीय तरुणाला कंपनीला कोणतीही पूर्वसूचना न देता काम सोडणं चांगलेच महागात पडलं आहे. बहिणीच्या लग्नासाठी भारतात येण्याची घाई आणि एका एजंटच्या जाळ्यात अडकल्यामुळं गेल्या चार महिन्यांपासून हा तरुण दुबईतील अल रशिदिया येथील तुरुंगात आहे. शशी कुमार पासवान (वय २३) असे या तरुणाचे नाव असून तो झारखंडमधील पलामू जिल्ह्याचा रहिवासी आहे. आपल्या मुलाची सुटका करून त्याला सुरक्षित मायदेशी आणावं, यासाठी त्याच्या कुटुंबानं आता केंद्र सरकार आणि प्रशासनाकडं धाव घेतली आहे. ‘हिंदूस्तान टाइम्स’ ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

बहिणीच्या लग्नासाठी घरी यायचं होतं

पलामू जिल्ह्यातील दादरा गावातील रहिवासी असलेले ललन पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा शशी कुमार २०२५ मध्ये एका खासगी कंत्राटी कंपनीत कामासाठी दुबईला गेला होता. २६ जून रोजी त्याच्या लहान बहिणीचं लग्न होतं. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शशीला भारतात यायचं होतं. मात्र, कंपनीकडून रीतसर परवानगी मिळण्यात अडचणी येत असल्याने त्याने एका ट्रॅव्हल एजंटशी संपर्क साधला. मायदेशी परतण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याने या एजंटला पैसेही दिले. परंतु, या प्रक्रियेत तो भलत्याच कायदेशीर कचाट्यात आणि एजंटच्या जाळ्यात अडकला.

कंपनीला न सांगता ७ दिवस गैरहजर राहणं पडलं महागात

पलामूचे पोलिस अधीक्षक कपिल चौधरी यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ललन पासवान यांनी सोमवारी हुसैनाबाद पोलिस ठाण्यात आपल्या मुलाच्या सुटकेसाठी अर्ज दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशीने कंपनीला कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा रीतसर राजीनामा न देता अचानक काम सोडलं. तसंच तो सलग सात दिवस कामावर गैरहजर राहिला. संयुक्त अरब अमिरातीच्या कामगार कायद्यानुसार पूर्वसूचना न देता काम सोडणं आणि गैरहजर राहणं हा गंभीर गुन्हा मानला जातो. याच कारणास्तव त्याला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो गेल्या चार महिन्यांपासून अल रशिदिया येथील तुरुंगात आहे.

‘लवकरच सुटेन’ या आशेवर कुटुंबानं चार महिने काढले

मुलाला अटक झाल्याचे समजल्यानंतरही कुटुंबाने चार महिने पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. शशीने फोनवरून आपण लवकरच यातून बाहेर पडू, असा धीर कुटुंबाला दिला होता. मात्र, चार महिने उलटूनही काहीच हालचाल न झाल्याने आणि कोणतीही सुटका न झाल्याने अखेर घाबरलेल्या कुटुंबाने प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत.

“माझ्या मुलाने आम्हाला आश्वासन दिले होते की तो लवकरच बाहेर येईल, म्हणून आम्ही चार महिने वाट पाहिली. पण आता आमचा धीर सुटला आहे. मी भारत सरकार आणि प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की, माझ्या मुलाला लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत,” अशी आर्त साद ललन पासवान यांनी घातली आहे.