Thailand Indian Youtuber Beggar Tourism Controversy : थायलंडमध्ये मोफत राहण्याच्या उद्देशाने मंदिराच्या परिसरात तंबू ठोकण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय युट्यूबरवर सोशल मीडियातून टीका होत आहे. बंशी असे या २३ वर्षीय युट्यूबरचे नाव असून, तो ‘एनिथिंग बंशी’ या युट्यूब चॅनेलवर प्रवासाचे व्हिडीओ प्रसिद्ध करतो. कमी खर्चात विविध देश फिरण्याचा त्याचा प्रयत्न नेटकऱ्यांना खटकला आहे. थायलंडमध्ये २२ दिवस घालवल्यानंतर त्याने उडोन थानी येथे हा व्हिडीओ चित्रित केला. ‘थायलंड पोलिसांनी मंदिरातून बाहेर पडण्यास सांगितले’ असे या ३३ मिनिटांच्या व्हिडीओचे शीर्षक आहे.

२० मिनिटांहून अधिक वेळ चर्चा

व्हिडीओच्या सुरुवातीला बंशी थायलंडमधील स्थानिक नागरिकांसोबत वेळ घालवताना दिसतो. काही स्थानिकांनी त्याला जेवणासाठी आमंत्रित केले आणि त्यांचे खाद्यपदार्थ खाण्याची पद्धतही समजावून सांगितली. मात्र, नंतर एका मंदिरात पोहोचल्यानंतर त्याने रात्री तिथे तंबू लावून राहण्याची परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला. एका बौद्ध भिक्षूने राहण्याची परवानगी दिल्याचे त्याने पोलीस आणि मंदिर प्रशासनाला सांगितले. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याला मंदिर परिसरात रात्र घालवण्यास नकार दिला.

आपला कोणताही चुकीचा हेतू नसल्याचे बंशी वारंवार सांगत होता. गेल्या तीन दिवसांपासून झोपलो नसल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी जवळच्या बजेट हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी ४०० बाटमध्ये राहण्याचा पर्याय दिला. मात्र, त्याने तो नाकारला. अखेर अधिकाऱ्यांनी त्याला सामान आवरून मंदिर परिसर सोडण्यास सांगितले.

‘पुरेसे पैसे नसतील तर असे प्रवास करू नका’

मंदिरातून बाहेर पडताना एका व्यक्तीने बंशीला पुरेसे पैसे नसताना प्रवास करण्यापासून सावध केले. अशा प्रकारे प्रवास केल्यास धोकादायक परिस्थिती उद्भवू शकते, असे त्याने सांगितले. “भिकाऱ्यासारखा प्रवास करू नका,” अशा शब्दांत त्याने बंशीला सुनावले. त्यानंतर बंशीने जवळच्या पेट्रोल पंपाजवळ तंबू उभारला.

थायलंड पोलिसांचे कौतुक; ‘बेगर टुरिझम’वरून चर्चा

या व्हिडीओला ४६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. परिस्थिती शांतपणे हाताळल्याबद्दल अनेक नेटकऱ्यांनी थायलंड पोलिसांचे कौतुक केले. काही नेटकऱ्यांनी मात्र अशा वर्तनाचे कायदेशीर परिणाम होऊ शकतात, असे नमूद केले. थायलंडमध्ये प्रवेशासाठीचे नियम, धार्मिक स्थळांवर तंबू लावण्यावरील निर्बंध आणि पर्यटक व्हिसावर काम करण्यासंबंधीच्या अटींचे पालन करण्याचा सल्ला त्यांनी दिला. पर्यटक व्हिसावर परवानगीशिवाय कमाई करणारे युट्यूब व्हिडीओ तयार करण्याच्या कायदेशीर बाबींचाही एका प्रतिक्रियेत उल्लेख करण्यात आला.

‘बेगर टुरिझम’ म्हणजेच पुरेसा खर्च न करता स्थानिकांकडून किंवा प्रशासनाकडून मोफत निवास आणि इतर सुविधा मिळवण्याच्या प्रयत्नांवरूनही चर्चा सुरू झाली. अशा वर्तनामुळे परदेशात भारतीय पर्यटकांच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी व्यक्त केली. मात्र, युट्यूबबरने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केल्याचे या वृत्तातून सिद्ध होत नाही. त्याच्या व्हिडीओतील प्रसंगावरून सोशल मीडियावर टीका आणि चर्चा सुरू झाली आहे.