Indian Citizens Stranded In Iran-Israel Conflict: इराण आणि इस्रायलमध्ये गेल्या आठवड्यापासून लष्करी संघर्ष सुरू आहे. आता हा संघर्ष आणखी तीव्र होत आहे. यामुळे या दोन्ही देशांमध्ये विद्यार्थी, यात्रेकरू, संशोधक आणि कामगारांसह लाखो भारतीय नागरिक अडकले आहेत. तेहरान आणि तेल अवीवमधील भारतीय दूतावास भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी त्यांच्याशी समन्वय साधत आहेत. यातील काही भारतीय नागरिक धार्मिक केंद्रांमध्ये, तर काही भारतीय विद्यार्थी विद्यापीठांमध्ये विखुरलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
दरम्यान, इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केल्यापासून उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या सकनी गावातील दहा विद्यार्थ्यांशी संपर्क साधणे कठीण झाले आहे. त्यापैकी २२ वर्षीय सदाफ जेहरा ही तेहरान विद्यापीठात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील झिया-उल-हसन म्हणाले, “तिने सांगितले की ती ठीक आहे, नंतर तिचा फोन बंद झाला. दुसऱ्या दिवशी तिने फोन केला आणि सांगितले की विद्यापीठाने त्यांना तीन तासांच्या अंतरावर असलेल्या सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.” याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
…तेव्हापासून त्याच्याशी संपर्क नाही
उत्तर प्रदेशातील आणखी एक विद्यार्थी अझहर अब्बास, एका क्षेपणास्त्र हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे. या हल्ल्यात त्याचे पाच वर्गमित्रांचा मृत्यू झाला आहे. याबाबत बोलताना त्याचे काका मुझम्मिल अब्बास म्हणाले की, “आम्ही तीन दिवसांपूर्वी त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोललो होतो. तेव्हापासून त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही.”
एक हजार यात्रेकरू इराणमध्ये अडकले
याचबरोबर उत्तर प्रदेशातील, इतर अनेकांची परिस्थिती अशीच आहे. लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि मेरठ येथील अनेक यात्रेकरू इराणमध्ये अडकले आहेत. त्यापैकी लखनौचे २८ यात्रेकरू आहेत, ज्यात ८३ वर्षीय कनीज हैदर यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत प्रवास करणारा त्यांच्या मुलगा अब्बास मुझफ्फर यांनी सांगितले की, “आम्ही सध्या सुरक्षित आहोत, पण आम्हाला भारतात परतायचे आहे. हॉटेल्स महाग आहेत. खूप खर्च होत आहे. यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत.”
मेहंदी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे टूर ऑपरेटर अकील जाफर रिझवी म्हणाले की, “लखनौमधील १,००० हून अधिक यात्रेकरू इराणमध्ये अडकले आहेत. त्यापैकी बऱ्याच जणांना आता पैशासाठी आणि औषधांसाठी संघर्ष करावा लागत आहे.”
केंद्र सरकारचे ऑपरेशन सिंधू
दरम्यान या दोन्ही देशांमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहेत. यासाठी सरकारने ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. तेहरान आणि तेल अवीवमधील भारतीय मिशन नागरिकांना आर्मेनिया, जॉर्डन आणि इजिप्तमध्ये हलवत आहेत. याचबरोबर या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी गृह मंत्रालयाकडून चार्टर्ड विमानांचे आयोजन करण्यात येत आहे.