India’s First Cow Culture Museum In Mathura: उत्तरप्रदेशमध्ये देशातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय उभं राहणार आहे. मथुरा येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हे संग्रहालय स्थापन केले जाईल. उत्तर प्रदेश ब्रज तीर्थ विकास परिषदेच्या पुढाकाराने उभारल्या जाणाऱ्या या संग्रहालयासाठी जमीन देखील निश्चित करण्यात आली आहे. 

संग्रहालयाचा उद्देश

प्रस्तावित संग्रहालयाचा मुख्य उद्देश गायींचे फायदे आणि त्यांच्या उत्पादनांबद्दल जनजागृती करणे हा आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून गायीचे धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले जाईल. संग्रहालय परंपरा आणि विज्ञानाचे मिश्रण असेल, अशी माहिती परिषदेच्या (Uttar Pradesh Braj Teerth Vikas Parishad) प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.

संकल्पना

राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालयात देशभरातील प्रमुख गायी त्यांच्या जाती आणि लुप्तप्राय जातींचे सुमारे १०० डिजिटल आणि प्रतीकात्मक मॉडेल ठेवले जातील. याशिवाय संग्रहालयात दूध आणि दूधापासून बनवलेल्या दही, चीज आणि तूप या उत्पादनांचे प्रदर्शन असेल. दूध उत्पादन वाढीचे तंत्र, वैज्ञानिक दृष्टीकोन यासह विविध फायदे नागरिकांना समजावून सांगितले जातील, असे ब्रज तीर्थ विकास परिषदेने म्हटले आहे.

‘गोमाता’

भारतात गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. सनातन परंपरेत गायीला विशेष महत्व आहे. गाय फक्त कृषी अर्थव्यवस्थेशी निगडीत नसून त्याला धार्मिक आणि सामाजिक महत्व देखील आहे, असे या प्रकल्पासोबत जोडलेल्या अधिकाऱ्यांचे मत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार होणाऱ्या हे संग्रहालय मथुराला आणखी वेगळी ओळख देईल.